4k समाचार
पनवेल दि. 16
शेकापमधून काही वर्षापूर्वी भाजपमध्ये आलेले हरेश केणी यांनी भाजपच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे.लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत त्यांच्या प्रभागात भाजपविरोधी मतदार जास्त असल्याने महापालिका निवडणुकीत फटका बसू नये म्हणून त्यांनी हा निर्णय घेतला असल्याचे बोलले जात आहे.

शेकापमधून हरेश केणी हे प्रभाग 3 मधून निवडून आले होते.हा भाग तळोजा विभागातील मुस्लिम बहुल भाग आहे. लोकसभा निवडणुकीत बटेंगे तो कटेंगे हा नारा पुढे आल्यानंतर काही समाज नाराज झाला आणि एकगठ्ठा मते भाजपविरोधी पदरात पडली.त्याचा परिणाम पनवेल विधानसभा मतदारसंघात देखील झाला.तळोजा हा पनवेलमधील सर्वाधिक मुस्लिम मतदार असलेला भाग ओळखला जातो. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे आणि प्रशांत ठाकूर यांना या भागातून मोठी पिछाडी मिळाली होती.हरेश केणी यांच्यासह आलेले अन्य नगरसेवक देखील याच भागातून शेकापमधून भाजपमध्ये आले होते.आता या सर्वांना होवू घातलेल्या महापालिका निवडणुकीचे भवितव्य समोर दिसू लागले.

या निवडणुकीत देखील भाजपमधून लढलो आणि पुन्हा आपल्याला फटका बसला तर राजकीय भवितव्य संपुष्टात येईल अशी भिती त्यांना जाणवू लागली.त्यातच माजी विरोधी पक्ष नेते प्रितम म्हात्रे यांनी देखील आपल्या समर्थकांसह भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांच्यासोबत देखील काही नगरसेवक भाजपवासी झाले.त्यामध्ये हरेश केणी यांचे राजकीय वजन कमी होत असल्याचे देखील हरेश केणी आणि समर्थकांना जाणवू लागले.याचा परिणाम म्हणून शेकापमधून मागील विधानसभा निवडणूक लढवलेले हरेश केणी त्याचे समर्थक नाराज झाले.त्याचे पर्यावसान हरेश केणी यांनी आपल्या भाजपच्या सदस्यत्वाचा राजीनामा तळोजा विभागीय तालुका मंडळ अध्यक्ष दिनेश खानावकर यांच्याकडे दिला आहे. वैयक्तिक कारण आणि विचारसरणीतील मतभेद असे कारण केणी यांनी राजीनामा पत्रात दिले आहे.

हरेश केणी हे शिंदे गटाच्या शिवसेनेत प्रवेश करणार होते पण भाजपसोबत त्यांची युती असल्याने पुन्हा पहिले पाढे पंचावन्न होवू शकतात म्हणून तो निर्णय होवू शकला नाही असे बोलले जात आहे. तर केणी आणि समर्थक काँग्रेस मध्ये देखील प्रवेश करू शकतात असे देखील सांगितले जात आहे.दरम्यान यापुढील त्यांची राजकीय दिशा त्यांनी ठरवली नसल्याने कार्यकर्त्यांसोबत चर्चा करून ते निर्णय घेणार असल्याचे कार्यकर्ते सांगत आहेत.
