4k समाचार दि. 20
पनवेल (प्रतिनिधी) हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताच्या सुवर्ण परंपरेला उजाळा देणारा पं. सवाई गंधर्व संगीत महोत्सव कुंदगोल येथील सवाई गंधर्व स्मारक भवन येथे दोन दिवसांच्या भव्य आयोजनात पार पडला. पं. सवाई गंधर्व यांच्या ७३व्या पुण्यतिथीनिमित्त, कर्नाटक सरकारच्या कन्नड व संस्कृती विभागाच्या सहकार्याने आयोजित या महोत्सवाने रसिकांना संगीताचा अनुपम असा आनंद दिला. या दोन दिवसीय महोत्सवात देशभरातील नामवंत कलाकारांनी आपल्या गायन-वादनाने रसिकांना मंत्रमुग्ध केले. आंतरराष्ट्रीय दर्जाच्या गायकांसोबत रायगड नवी मुंबईचे सुपुत्र पं. उमेश चौधरी यांनीही आपल्या शास्त्रीय संगीत गायनाचा ठसा उमटवला.पं. उमेश चौधरी यांनी सुरेल रचना सादर करून वातावरण भारून टाकले. रागातील नेमकेपणा, आवाजातील मधुरता आणि तालातील सुंदर समन्वयामुळे उपस्थित रसिक मंत्रमुग्ध झाले. त्यांच्या सादरीकरणाला उपस्थित संगीत प्रेमींकडून भरभरून दाद मिळाली.


महोत्सवाचे उद्घाटन मान्यवर महंतांच्या उपस्थितीत झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पद्मश्री डॉ. अरविंद काटगी होते. यावेळी जयपूर-अत्रौली घराण्याच्या प्रख्यात गायिका पद्मश्री अश्विनी भिडे-देशपांडे यांना “सवाई गंधर्व राष्ट्रीय संगीत पुरस्कार” प्रदान करून गौरविण्यात आले.पहिल्या दिवशी पद्मश्री अश्विनी भिडे-देशपांडे, विदुषी पद्मिनी राव, पं. उमेश चौधरी, पं. कृष्णचंद्र वाडिकर, विद्वान द्वारकानाथ आणि पं. रतन मोहन शर्मा यांच्या सादरीकरणांनी सभागृह दुमदुमले.

तर दुसऱ्या दिवशीच्या समारोप सत्रात पद्मश्री म. वेंकटेश कुमार, पं. गणपत भट, पं. विनोद दिग्राजकर, पं. बी. एस. मठ, विदुषी अक्कामहादेवी मठ, श्रीमती वीणा शिवानंद, पं. अशोक नादगीर आणि शास्वती चौहान यांच्या सुरावटींनी रसिक मंत्रमुग्ध झाले. तबला साथीसाठी पं. रवींद्र यावगल, डॉ. उदय कुलकर्णी, श्री. कृष्णकुमार कुलकर्णी, पं. विनायक नाईक, पं. अल्लामप्रभू कडकोळ, श्रीहरी दिग्गवी व श्री. बसवराज हिरेमठ यांनी उत्कृष्ट वादन केले. हार्मोनियमवर डॉ. सुधांशू कुलकर्णी, श्री. बसवराज कुमार आणि उपेंद्र शशबुद्धे यांनी सुरेल साथ दिली. टाळ्यांचा गजर, आनंदमयी वातावरण आणि संगीताच्या माधुर्यात रंगलेल्या या महोत्सवाने केवळ पं. सवाई गंधर्व यांच्या स्मृतींना अभिवादन केले नाही, तर शास्त्रीय संगीताच्या परंपरेलाही नवा उजाळा दिला. त्याबद्दल आयोजक मंडळाने सर्व मान्यवर, कलाकार व रसिकांचे मनःपूर्वक आभार मानले.