4k समाचार दि. 25
पनवेल (प्रतिनिधी) पनवेल महानगरपालिका हद्दीतील पाणी पट्टी करावरील शास्तीमध्ये सवलत (अभय योजना) लागू करून १०० टक्के शास्ती माफ करण्याची मागणी पनवेल महानगरपालिकेचे माजी सभागृहनेते परेश ठाकूर यांनी महानगरपालिकेचे आयुक्त मंगेश चितळे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

या संदर्भात त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे कि, पनवेल महानगरपालिका स्थापन होऊन नऊ वर्षे पूर्ण झाली आहे. पनवेल महानगरपालिकेमार्फत सध्या मालमत्ता धारकांसाठी अभय योजना लागू केली असून सदर योजनेचा नागरीक मोठ्या प्रमाणात लाभ घेत आहेत. त्यामुळे पनवेल महानगरपालिकेचे थकीत मालमत्ता कर देखील जमा होण्यास मदत होत आहे. याच धार्तीवर पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील नागरीकांकडून पाणी पट्टी करावरील शास्ती माफ करण्यासाठी देखील अभय योजना लागू करावी अशी मागणी होत आहे.

त्यामुळे पाणी पट्टी करावरील ही शास्ती १०० टक्के माफ करण्याकरीता पनवेल महानगरपालिकेकडून अभय योजना लागू करणे अत्यंत गरजेचे आहे. जेणेकरुन नागरीक वेळेत पाणी पट्टी बीले भरतील व पनवेल महानगरपालिकेस थकीत पाणी पट्टी कर जमा होण्यास मदत होईल व पनवेल महानगरपालिकेच्या उत्पन्नात देखील भर पडेल. या सर्व विषयाचे महत्वपूर्ण गांभिर्य लक्षात घेता पनवेल महानगरपालिका हद्दीतील पाणी पट्टी करावरील शास्तीमध्ये सवलत देण्यासाठी अभय योजना लागू करुन १०० टक्के शास्ती माफ करण्याकरीता पनवेल महानगरपालिका प्रशासनाकडून लवकरात लवकर योग्य ती उपाययोजना करण्यात यावी, असेही माजी सभागृहनेते परेश ठाकूर यांनी आपल्या निवेदनात अधोरेखित केले आहे.
