पनवेल, दि.15 (वार्ताहर) ः शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे पनवेल महानगरपालिका सह संपर्कप्रमुख बाळाराम मुंबईकर यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांनी तळोजा भोईरपाडा येथील राहत्या घरी वयाच्या 68 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला.

बाळाराम मुंबईकर यांनी यापूर्वी शिवसेनेच्या तळोजा विभागप्रमुख आणि पनवेल उपतालुकाप्रमुखपदाची जबाबदारी यशस्वीरित्या पार पाडली होती. 1967 पासून शिवसेनेत सक्रिय असून, पक्ष स्थापनेपासून (1966) जवळजवळ पहिल्या टप्प्यातील कार्यकर्ते म्हणून त्यांची ओळख होती, असे शिवसेना उपनेते बबनदादा पाटील यांनी सांगितले. शिवसेनेनं एक कडवा, निष्ठावान कार्यकर्ता गमावला, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.

राजकारणासोबतच बाळाराम मुंबईकर यांचा अध्यात्मिक जीवनातही सक्रिय सहभाग होता. ते वारकरी संप्रदायाचे अनुयायी होते आणि दरवर्षी आळंदीची पायी वारी करायचे. त्यांना भजनाची विशेष आवड होती. त्यांच्या अंत्ययात्रेला राजकीय, सामाजिक तसेच परमार्थिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून श्रद्धांजली अर्पण केली.
