4k समाचार दि. 29
पनवेल येथील मुंबई पुणे हायवे लगत असलेल्या मुख्य अमरधाम स्मशान भूमीची प्रचंड दुरवस्था झाली होती. २ खाजगी कंत्राटदारांतर्फे व्यवस्थापन करण्यात येत असलेल्या ह्या स्मशान भूमीतील दुरावस्थेचे कथन करणारे एक निवेदन शिवसेना नेते चंद्रशेखर सोमण ह्यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने दिनांक ११.०८.२०२५ रोजी महापालिका आयुक्त श्री.मंगेश चितळे ह्यांच्याशी चर्चा करून फोटो पुराव्यासहित दिले होते. अमरधाम स्मशानभूमीतील पिण्याचे पाणी, आसन व्यवस्था,शववाहिन्यांची अंतर्गत दुरवस्था, अपुरी प्रकाश व्यवस्था, बंद पडलेले इन्व्हर्टर, लहान मुलांची दफनभूमी. इ. विषयांबाबतीत मा.आयुक्तांचे लक्ष वेधले होते.

श्री.चंद्रशेखर सोमण ह्यांच्या नेतृत्वाखाली उपमहानगर प्रमुख महेश सावंत, शिवसेना शहरप्रमुख प्रसाद सोनावणे, शहर संघटक अभिजीत साखरे, उपशहर संघटक सिद्धेश खानविलकर, खंडेश धनावडे, सुजन मुसलोंडकर, माजी नगरसेवक अनिलकुमार कुलकर्णी इत्यादी कार्यकर्त्यांनी आयुक्तांशी तपशिलवार चर्चा करून सदरची स्मशानभूमी इतरत्र स्थलांतरित होणार असल्याच्या ऐकीव चर्चेवर ठोस भूमिका घेऊन स्थलांतरणाला विरोध केला आहे. तेथील सर्व गैरसोयी दूर करण्या सोबतच २४ तास सुरक्षा रक्षक ठेवण्याची मागणी केली होती!! सदरचे निवेदन देऊन महिना उलटला तरी काही हालचाल न झाल्यामुळे शिवसेना नेते चंद्रशेखर सोमण ह्यांनी पुनश्च एकदा महापालिका प्रशासनास दिनांक २५.०९

२०२५ रोजी स्मरणपत्र पाठवून तात्काळ कार्यवाहीची सूचना केली होती. त्या नंतर लगेचच महापालिका आयुक्त मंगेश चितळे ह्यांनी हा विषय गांभीर्याने घेतला आणि संबंधित विभागाकडून अमरधाम स्मशान भूमीच्या स्वच्छता मोहिमेला ताबडतोब सुरुवात करून तसे फोटो शिवसेना शिष्टमंडळास पाठवले. ह्या बरोबरच पनवेल महानगर पालिका हद्दीतील सर्वच प्रमुख स्मशान भूमींची महिन्यातून २ वेळा स्वच्छता करण्यात येईल असे आश्वासन दिले व इतर पायाभूत सुविधांसाठी सुद्धा तातडीने कार्यवाही करण्याचे आदेश दिले. महापालिकेच्या या कार्यवाहीचे शिवसेना पनवेल शाखेने आभार मानले आहेत.
