पनवेल, दि. ६ मे (4K News):
पनवेलचे माजी नगराध्यक्ष आणि शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते श्री. जे. एम. म्हात्रे यांनी भाजप प्रवेशाचा निर्णय घेतल्यानंतर ग्रामीण भागातून त्यांना प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. या वाढत्या पाठिंब्याच्या पार्श्वभूमीवर पक्षप्रवेशाची तारीख दोन दिवस पुढे ढकलण्यात आली आहे.

पक्षाच्या कार्यपद्धतीबाबत आपल्या मागण्यांची दखल घेतली जात नसल्याबद्दल त्यांनी नुकत्याच पार पडलेल्या जाहीर मिटिंगमध्ये नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर ५ मे रोजी सकाळी कार्यकर्त्यांशी चर्चा करून त्यांनी भाजप प्रवेश निश्चित केला व ७ मे रोजी पत्रकार परिषद घेऊन हे जाहीर केले.

मात्र, त्यानंतर अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी म्हात्रे यांच्याशी संपर्क साधत, “आम्ही तुमच्या सोबत आहोत” असा ठाम पाठिंबा दर्शवला. अनेकांनी आपल्या भागातील कार्यकर्त्यांना सहभागी करून घेण्यासाठी आणखी वेळ मागितला. पनवेल, उरण आणि खालापूर येथील कार्यकर्त्यांशी थेट संवाद साधून त्यांच्यासोबत भाजप प्रवेश करण्याची मागणी पुढे आली.
म्हात्रे यांनी सांगितले की, “ग्रामीण भागातील अनेक ज्येष्ठ सहकारी सोशल मीडियाचा वापर करत नाहीत. त्यांच्याशी थेट संवाद साधून, ग्रामपंचायत सदस्यांपासून ते नगरसेवकांपर्यंत सर्वांना विश्वासात घेऊनच प्रवेश करणार आहोत.”
या निर्णयामुळे म्हात्रे यांचा भाजप प्रवेश अधिक व्यापक आणि संघटित होणार असल्याची चिन्हे आहेत.

संपादक गौरव जहागीरदार
9967447111