पनवेल 4K News:उरण विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा धर्म म्हणून शिवसेनेचे अधिकृत उमेदवार मनोहर भोईर यांचा प्रचार करण्यात आला. मात्र, उरणमधून प्रितम म्हात्रे यांनी अपक्ष उमेदवारी दिल्यामुळे महाविकास आघाडीत बिघाडी झाली. “ही उमेदवारी भाजपाच्या फायद्यासाठी होती का? प्रितम म्हात्रे यांनी भाजपाची सुपारी घेतली होती का?” असा थेट सवाल काँग्रेसचे रायगड जिल्हाध्यक्ष सुदाम पाटील यांनी उपस्थित केला आहे.

पनवेल येथे रविवारी (४ मे) काँग्रेस भवनात झालेल्या तातडीच्या बैठकीत त्यांनी ही टीका केली. या बैठकीत संघटनात्मक वाढ, संविधान व सद्भावना रॅली तसेच आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या तयारीवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
आघाडी धर्माचे पालन फक्त काँग्रेसनेच:
“कॉंग्रेस पक्षाने आपला आघाडी धर्म प्रामाणिकपणे पाळला. त्यामुळे आमच्यावर आरोप करणं म्हणजे ‘चोराच्या उलट्या बोंबा’,” असा खरमरीत टोला पाटील यांनी लगावला. त्यांनी स्पष्ट केले की, पनवेल विधानसभा निवडणुकीत शेतकरी कामगार पक्षाचे अधिकृत उमेदवार बाळाराम पाटील यांचा प्रचार काँग्रेसने प्रामाणिकपणे केला, तोही कोणताही पक्षादेश नसताना.
जातीनिहाय जनगणनेचा ठराव:
केंद्र सरकारने २०२१ च्या जनगणनेत विलंब केल्याबद्दल टीका करत, राहुल गांधी यांच्या दबावामुळेच केंद्र सरकार जाती जनगणनेबाबत पावले उचलत असल्याचे सांगण्यात आले. यासाठी राहुल गांधी यांचे आभार मानणारा ठरावही बैठकीत संमत करण्यात आला.
या बैठकीस काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष कॅप्टन कलावत, प्रदेश सचिव विजय चव्हाण, महिला जिल्हाध्यक्षा निर्मला म्हात्रे, युवक अध्यक्ष हेमराज म्हात्रे, माजी सभापती वसंत काठावले, पनवेल अध्यक्ष लतीफ शेख यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
