पनवेल, (4K News)– “मी आजही शेतकरी कामगार पक्षाचा प्रामाणिक कार्यकर्ता आहे, मात्र महाविकास आघाडीची भूमिका पटत नसल्यामुळे मी त्यातून बाहेर पडत आहे,” असे स्पष्ट वक्तव्य नगराध्यक्ष जे. एम. म्हात्रे यांनी पनवेलमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत केले.
म्हात्रे यांनी सांगितले की, “गेल्या ४८ वर्षांपासून मी शेकापच्या माध्यमातून राजकारणात सक्रिय आहे. पक्षाने जी जबाबदारी दिली, ती मी नेहमी प्रामाणिकपणे पार पाडली. मात्र, नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीत माझा मुलगा प्रितम म्हात्रे उरण मतदारसंघातून शेकापच्या तिकिटावर उभा असताना, महाविकास आघाडीने त्याच्या विरोधात काम केले. परिणामी, आमचा निसटता पराभव झाला.”

“या प्रकाराची माहिती मी पक्षश्रेष्ठींना वेळोवेळी दिली आणि महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याची मागणी केली. पण पक्षाने ती मागणी मान्य केली नाही. त्यामुळे मी माझ्या कार्यकर्त्यांसह आघाडीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले.
त्यांनी आणखी सांगितले की, “शेकापच्या अलीकडील कार्यक्रमांमध्ये मला डावलण्यात आले. अक्षय तृतीयेला पक्ष कार्यालयाच्या उद्घाटनात व बैठकीत मला बोलावण्यात आले नाही. तरीही मी एक प्रामाणिक कार्यकर्ता म्हणून कार्यालयात जाऊन पाया पडलो.”
येत्या सोमवारी पनवेल, उरण व खालापूर मतदारसंघातील कार्यकर्त्यांची बैठक बोलावण्यात आली असून, “पुढील राजकीय दिशा ही कार्यकर्त्यांच्या सल्ल्यानुसार ठरेल. त्यांचाच निर्णय अंतिम असेल,” असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
“आमचे आधीपासून व्यवसाय आहे. त्यामुळे काही जण मला दुसऱ्या पक्षात गेलोय असे म्हणत आहेत, पण मी अपक्ष राहिलो तरी माझे काम थांबणार नाही,” असे स्पष्टीकरण देत त्यांनी अफवांना फाटा दिला.
