पनवेल, दि. ६ मे (4K News):
पनवेलचे आमदार आणि भाजपचे ज्येष्ठ नेते प्रशांत ठाकूर यांच्या नावाने अज्ञात व्यक्तींनी नागरिकांना फोन करून पैशांची मागणी केल्याची गंभीर आणि धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकारामुळे नागरिकांमध्ये संभ्रम व चिंता निर्माण झाली असून, आमदार ठाकूर यांनी याबाबत पनवेल शहर पोलीस ठाण्यात तातडीने तक्रार दाखल केली आहे.

ही फसवणूक ३ मे रोजी उघडकीस आली. काही नागरिकांना अज्ञात नंबरवरून फोन आले, ज्यामध्ये पंजाबी भाषेत बोलणाऱ्या व्यक्तींनी आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नावाचा उल्लेख करत पैशांची मागणी केली. काही नागरिकांनी संशय व्यक्त करत जाब विचारताच संबंधित व्यक्तींनी कॉल कट केला.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन आमदार ठाकूर यांनी सांगितले की, “माझ्या नावाने फसवणूक होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर मी तातडीने पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. कोणीही अशा फसवणुकीला बळी पडू नये. माझ्या नावाने कोणालाही फोन आल्यास कृपया पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करावी किंवा मला कळवावे.”

दरम्यान, पनवेल पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला असून, कॉल करणाऱ्यांचा शोध घेतला जात आहे. नागरिकांना अशा प्रकारच्या फसवणूक करणाऱ्या कॉलपासून सावध राहण्याचे आवाहनही प्रशासनाने केले आहे.

संपादक : गौरव जहागीरदार
9967447111