4k समाचार
पनवेल दि.30 (वार्ताहर): पनवेल आणि उरणच्या विकासासाठी मनातील तळमळ ही मानत ठेवून उपयोगाची नसल्यामुळे केवळ समाजकार्य करण्यापेक्षा राजकीय पाठबळ घेऊन समाजाची सेवा करण्याबाबत नुकतेच शिंदे गटातून बरखास्त झालेले नेते रुपेश पाटील यांनी समाजसेवक तेजस डाकी यांना देत, पनवेल उरणच्या विकासाच्या दृष्टीने अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करण्याचा सल्ला दिला. त्यानंतर मंगळवारी ३० सप्टेंबर रोजी दुपारी मुंबई येथील नरिमन पॉईंट येथे उपमुख्यमंत्री अजित पवार, पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खा. सुनील तटकरे, मंत्री महोदय अदिती तटकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत रुपेश पाटील आणि तेजस डाकी यांच्यासह असंख्य पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश होणार असल्याचा राजकीय बॉम्ब त्यांनी आयोजित परिषदेत टाकला आहे. यावेळी राष्ट्रवादी पक्षात जाऊन जनतेची सेवा कशी करता येईल याबाबत आपली भूमिका त्यांनी स्पष्ट केली.

महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर उरण तालुक्यात एक नवे राजकीय समीकरण घडत आहे. युवा नेते रुपेश पाटील आणि समाजसेवक तेजस डाकी या दोघांनी एकत्र उरणच्या विविध समस्या समोर आणत अजितदादांच्या राष्ट्रवादी पक्षाला बाळकटी देण्यासाठी राष्ट्रवादीचा झेंडा हाती घेण्याचा निर्णय घेतला. त्यांनी विशेषतः उरण-खोपटे, चिरनेर-गव्हाण आणि खोपटा-कोप्रोली रस्त्यांवरील वाहतूक कोंडीवर भाष्य केले. “कंटेनर वाहनांच्या वाढत्या संख्येमुळे रस्ते सतत कोंडीत अडकलेले असतात. चुकीच्या दिशेने वाहने चालवणे आणि खराब रस्त्यांमुळे अपघात वाढले आहेत तसेच नागरिकांना रोजच्या प्रवासात तासनतास अडकावे लागत आहे, यांचबरोबर पनवेल आणि तालुक्यातील आरोग्य सुविधांबाबत तसेच उरण तालुक्यातील तरुणांच्या रोजगाराचा प्रश्न जटील झाला असल्यामुळे, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष खा. सुनील तटकरे आणि मंत्री महोदय अदितीताई तटकरे यांच्या सहकार्याने याठिकाणी जनतेला भेडसावणारे प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न करणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

रुपेश पाटील आणि तेजस डाकी यांच्या एकत्रित येण्यामुळे उरणच्या राजकारणात नव्या समीकरणाची चर्चा सुरू झाली आहे. डाकी, ज्यांनी नुकत्याच झालेल्या उरण विधानसभा निवडणुकीत समाजसेवक म्हणून अपक्ष उमेदवार म्हणून भाग घेतला होता, आणि रुपेश पाटील, जे युवा सेनेच्या माध्यमातून स्थानिक मुद्द्यांवर सक्रिय आहेत, हे दोघे आता एकत्र आल्यामुळे उरणच्या विकासासाठी काम करणार आहेत, असे असे सांगितले. यावेळी रुपेश पाटील आणि तेजस डाकी यांच्या या एकत्रित प्रयत्नांमुळे त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह पहायला मिळत आहे. मंगळवारी दिनांक ३० सप्टेंबर रोजी दुपारी मुंबई येथील नरिमन पॉईंट येथे उपमुख्यमंत्री अजित पवार, पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खा. सुनील तटकरे, मंत्री महोदय अदिती तटकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत रुपेश पाटील आणि तेजस डाकी यांच्यासह असंख्य पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश होणार होणार असल्याचे त्यांनी यावेळी जाहीर केले.
