कामोठे 4k News दि. 25 मुंबई : आगामी मुंबई महापालिकेसह राज्यातील महानगरपालिका व नगरपालिका निवडणुकांमध्ये महायुतीची सत्ता प्रस्थापित करण्यासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे कार्यकर्ते पूर्ण तयारीला लागावेत, असे आवाहन आरपीआयचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस गौतम सोनवणे यांनी केले.
ते मुंबईत आयोजित बैठकीत बोलत होते. यावेळी त्यांनी सांगितले की, सध्या पक्षाच्या वतीने ‘गाव तिथे शाखा’ हे अभियान राज्यभर राबवले जात असून, सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका रिपब्लिकन पार्टीच्या माध्यमातून लढविण्यात येणार आहेत. पक्ष बळकट करण्याच्या हेतूने जिल्हास्तरीय कार्यकर्त्यांचे मेळावे घेतले जात आहेत.

३ नोव्हेंबर रोजी महाड येथे राज्यस्तरीय मेळावा संपन्न होणार असून, या मेळाव्यात जिल्ह्यातील नगरपालिका, नगरपंचायती आणि इतर स्थानिक निवडणुका आरपीआयच्या तिकिटावर लढवण्याचा निर्णय घेण्यात येईल, असेही सोनवणे यांनी सांगितले.
ते पुढे म्हणाले, “डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांनी प्रेरित आमचा पक्ष सर्व समाजघटकांना सोबत घेऊन समान संधी व समान न्याय देण्याच्या भूमिकेतून कार्य करतो. आगामी काळात पक्ष संघटन अधिक मजबूत करण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहोत.”

राज्यातील आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व केंद्रीय समाज कल्याण राज्य मंत्री रामदास आठवले यांच्या नेतृत्वाखाली ‘संवाद जनतेशी’ हे अभियान सुरु करण्यात येणार आहे. या अभियानाअंतर्गत राज्यभर जिल्हास्तरीय मेळावे आयोजित केले जाणार असून, त्याचाच एक भाग म्हणून महाड येथे होणाऱ्या ३ नोव्हेंबर रोजी ६८व्या वर्धापन दिनाच्या मेळाव्यात महत्त्वाचे निर्णय जाहीर केले जातील.
या बैठकीला गौतम सोनवणे (सरचिटणीस – आरपीआय महाराष्ट्र प्रदेश), प्रकाश जाधव (कामगार नेते), संजय पवार (दक्षिण मुंबई जिल्हा अध्यक्ष), शिरीष चिखळकर (दक्षिण मुंबई जिल्हा सरचिटणीस), विशाल गायकवाड, विजय शेट्टी आदी मान्यवर उपस्थित होते.

