4kNews कामोठे
उरण दि 31 (विठ्ठल ममताबादे )उरणमधील डाऊर नगरचे सुपुत्र डॉ. मोहम्मद आमिर शेख यांनी मुंबईतील प्रतिष्ठित एनएमआयएमएस (NMIMS) विद्यापीठातून अभियांत्रिकी विषयात पीएच.डी पदवी संपादन करून उरण, रायगड परिसराच्या शैक्षणिक क्षेत्रात मानाचा तुरा रोवला आहे.

मुंबई येथे आयोजित करण्यात आलेल्या पदवीदान समारंभात त्यांना अभियांत्रिकी विषयातील पीएच.डी. पदवी प्रदान करण्यात आली. या दिमाखदार समारंभास प्रमुख पाहुण्या म्हणून बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्त श्रीमती अश्विनी भिडे उपस्थित होत्या.
डॉ. मोहम्मद आमिर शेख सध्या पिल्लई एचओसी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी येथील इलेक्ट्रिकल अँड कॉम्प्युटर इंजिनिअरिंग विभागात प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. अध्यापन आणि संशोधन क्षेत्रात त्यांनी सातत्याने केलेल्या कार्याची दखल घेतली जात असून, पीएच.डी. पदवी संपादन करणे ही त्यांच्या शैक्षणिक कारकिर्दीतील एक महत्त्वपूर्ण उपलब्धी आहे.

उरण, रायगड परिसरातील विद्यार्थ्यांसाठी उच्च शिक्षण व संशोधनाच्या क्षेत्रात त्यांची ही कामगिरी प्रेरणादायी ठरणार आहे. उरण परिसरातील एका तरुणाने अभियांत्रिकी क्षेत्रात पीएच.डी.सारखी उच्च शैक्षणिक पात्रता प्राप्त करणे ही अत्यंत अभिमानास्पद बाब असून, त्यांच्या या यशामुळे उरणच्या शैक्षणिक क्षेत्राच्या लौकिकात भर पडली आहे.
या यशाबद्दल डॉ. आमिर शेख यांनी आपले वडील रियाज अहमद, माजी उपप्राचार्य (निवृत्त), आई श्रीमती निशात बानो, पत्नी जैनब खातून, भगिनी, मित्रपरिवार तसेच सर्व हितचिंतकांचे मनःपूर्वक आभार व्यक्त केले आहेत.

डॉ. मोहम्मद आमिर शेख यांच्या या उल्लेखनीय शैक्षणिक यशाबद्दल उरण, रायगड परिसरातून सर्व स्तरांतून त्यांचे अभिनंदन होत असून, त्यांच्या भावी संशोधन व शैक्षणिक कार्यासाठी शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

