4kNews कामोठे
पनवेल, दि. ९ (वार्ताहर) : लोकशाही आणि संविधानाच्या रक्षणाचा मुद्दा उपस्थित करत पनवेल शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने शुक्रवारी (९ ऑक्टोबर) शिवाजी चौक येथे निषेध सत्याग्रह करण्यात आला. यावेळी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या पुतळ्याचे दहन करून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली.

भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने पुकारलेल्या ‘लोकशाहीसाठी काळा दिवस’ या आंदोलनांतर्गत झालेल्या या सत्याग्रहात निवडणूक आयोगाच्या उत्तरदायित्वासह निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकता आणि विश्वासार्हतेचा मुद्दा उपस्थित करण्यात आला. काँग्रेस कार्यकर्त्यांनी केंद्र सरकारच्या भूमिकेचा निषेध नोंदविला.

जिल्हाध्यक्षा डॉ. श्रुती म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनात नगरसेवक हरेश केणी, लतीफ शेख, माजी नगरसेविका शशिकला सिंग, राज सदावर्ते, राकेश चव्हाण, जोन जेम्स, विशाल गोगावलकर, अजय कापरे, अमीना खान, मोहसूर खान, जिनेद मालदार, असल्फा खान यांच्यासह काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.
लोकशाही मूल्यांचे रक्षण आणि निवडणूक आयोगाच्या उत्तरदायित्वासाठी संघर्ष सुरू ठेवण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.

