4kNews कामोठे दि. 9
पनवेल (वार्ताहर) : सहकार क्षेत्रातील महिलांचा सहभाग वाढविणे आणि त्यांना कार्याची नवी दिशा देण्याच्या उद्देशाने सहकार भारती महाराष्ट्र प्रदेश आयोजित नारीशक्ती संमेलन शिर्डी येथे पार पडले. या दोन दिवसीय संमेलनात राज्यभरातून सुमारे दोन हजार महिलांनी सहभाग घेतला.

संमेलनाचे उद्घाटन जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील, महिला व बालविकास राज्यमंत्री मेघनाताई बोर्डीकर, सहकार भारतीचे राष्ट्रीय अध्यक्ष उदय जोशी, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष दत्ताराम चाळके, महामंत्री विवेक जुगादे आणि प्रदेश महिला प्रमुख वैशाली आव्हाड यांच्या उपस्थितीत झाले. महिलांचा सहकारातील सहभाग हा पर्याय नसून सहकार क्षेत्राचा भक्कम आधार बनायला हवा, असे मत राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केले. मेघनाताई बोर्डीकर यांनीही सहकारातून समृद्धी साधता येते, असे सांगितले.
प्रदेश महिला प्रमुख वैशाली आव्हाड यांनी प्रास्ताविकात महिलांना सहकार क्षेत्रातील स्वतःच्या सामर्थ्याची जाणीव करून देणे हा संमेलनाचा उद्देश असल्याचे स्पष्ट केले. यावेळी ‘नारीशक्ती सहकार दर्पण’ या स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले.

संमेलनात मुख्यमंत्री कार्यालयाच्या प्रशासकीय अधिकारी डॉ. मंजुषा कुलकर्णी, कर्नाटकच्या आमदार शशिकला जोल्ले, माजी आमदार स्नेहलता कोल्हे, जीएस महानगरच्या अध्यक्षा गीतांजली शेळके आणि महाराष्ट्र राज्य मच्छीमार फेडरेशनच्या अध्यक्षा ज्योती मेहेर यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी मार्गदर्शन केले. सहकारातील संधी, महिलांना भेडसावणाऱ्या अडचणी, युवा सहभाग, नेतृत्व, शासकीय योजना आणि सायबर सुरक्षा अशा विविध विषयांवर चर्चा झाली.
राष्ट्रीय संघटनमंत्री संजय पाचपोर यांनी सहकार क्षेत्रात प्रामाणिकपणा आणि संवेदनशीलता महत्त्वाची असल्याचे सांगितले. राष्ट्रीय अध्यक्ष उदय जोशी यांनी संस्कार, व्यावसायिक दृष्टिकोन आणि देशप्रेम यांच्या आधारे सहकार क्षेत्र राष्ट्रविकासात महत्त्वाची भूमिका बजावू शकते, असे मत व्यक्त केले.

या संमेलनात पतसंस्था व सहकारी बँकांच्या संचालिका, बचत गटांच्या प्रतिनिधी आणि विविध सहकारी संस्थांतील महिलांनी सहभाग घेतला. पनवेलमधून सहकार भारतीच्या पनवेल महानगर महिला प्रमुख अपर्णा नाडगौंडी यांच्या नेतृत्वाखाली महिलांचे पथक सहभागी झाले. यात १५ बचत गटांच्या प्रतिनिधींसह तुळजाभवानी पतसंस्था आणि कमळ महिला पतसंस्थेच्या संचालिकांचा समावेश होता.
संमेलनाच्या यशस्वितेसाठी पनवेल बचत गट प्रकोष्ठ प्रमुख स्वप्ना साखरे, स्मिता शेडगे, शैला खाडे, संघटन प्रमुख संतोष पोकळे, महानगरपालिका दीनदयाळ उपाध्याय योजनेच्या व्यवस्थापक विनया म्हात्रे आणि कीर्तनकार सुनीता खरे यांनी सहकार्य केले.

