पनवेल दि.०७ (वार्ताहर) (4kNews): महाड येथुन गोवांशाची कत्तल करून गोवंषवर्गिय जनावरांचे मांस विक्रीच्या उद्देषाने मुंबई येथे घेऊन जाणाऱ्या दोन गाड्यास पनवेल शहर पोलिसांच्या पथकाने पळस्पे फाटा येथे जागरूक नागरिकांच्या मदतीने अडवले असून यावेळी ४ जणांना पनवेल शहर पोलिसांनी ताब्यात घेतले असून इतर ३ जण पसार झाले आहे.

महाड येथून दोन वाहनांमध्ये अवैधरित्या गौमांसची वाहतूक करणार असल्याची माहिती एका जागरूक नागरिकाला मिळाली. त्याने तात्काळ याबाबत पनवेल शहर पोलीस ठाण्याच्या अंतर्गत असलेल्या पळस्पे चौकी येथे असलेले पोलीस कर्मचारी पो.ना. जगताप व पो.शि मोकल यांना सदर घटना सांगितली.

तात्काळ पोलिसंनी पळस्पे पोलीस बिट चौकी समोरील ब्रिजखाली येथे सापळा रचून संशयित वाहने पनवेलच्या दिशेने येताना दिसताच त्यांना थांबवले. यावेळी वाहनांमध्ये असलेले ७ जण पळून जाण्याचा प्रयत्न करत असताना त्यापैकी सलमान शेख (वय 30, रा कुर्ला), फैजल दसुलकर (वय 29, कुर्ला), अमीर खान (वय 42, घाटकोपर), काषीद खान (वय 22, विक्रोळी) या चौघांना पनवेल शहर पोलिसांच्या पथकाने ताब्यात घेतले तर इतर तिघे जण पळून गेले.

यावेळी पोलिसांनी वाहनांची तपासणी केली असता गाडीत लाल रंगाचे मोठ्या जनावरांचे गोवंषवर्गिय काळया ताडपत्रीत झाकलेले अंदाजे 500 ते 600 किलो मास व मास कापण्याचे हत्यार आढळून आले. याप्रकरणी पनवेल शहर पोलिसांनी भारतीय न्याय संहिता (बी एन एस), 2023 कलम 3(5), 325 आणि महाराष्ट्र पशु संरक्षण अधिनियम, १९७६ कलम ५बी, ५सी अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
