
कामोठे (4K News)परिसरातील रस्त्यांची अवस्था दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. सर्वत्र खड्ड्याच खड्डे असल्याने नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे. पावसाळ्याच्या काळात अनेक वेळा पत्रव्यवहार करूनही पालिकेकडून केवळ एकच उत्तर मिळते – “पाऊस कमी झाल्यावर काम करू”… पण जोपर्यंत अपघात होत आहेत त्याची जबाबदारी कोण घेणार, असा संतप्त प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
अलीकडेच एका व्यक्तीचा आपल्या लहान मुलासोबत अपघात झाला. खड्ड्यामुळे दुचाकी घसरली. त्या बाळाची चूक काय? नागरिकांचा आक्रोश वाढला आहे.
मालमत्ता कर भरूनही नागरिकांना सुरक्षित रस्ते मिळत नाहीत. आयुक्त फक्त चौकशी समित्या स्थापून वेळ मारून नेत आहेत, असा आरोप नागरिकांनी केला आहे.
याच निषेधार्थ या रविवारी, सर्वपित्री अमावस्येला सकाळी 10.30 वाजता सत्यकेतू समोरील चौकात ‘श्राद्ध’ आंदोलन आयोजित करण्यात आले आहे.
“राजकीय मतभेद बाजूला ठेवून प्रत्येक नागरिकाने एकत्र यावे, कारण हा खड्ड्यांचा त्रास सर्वांचा आहे,” असे आवाहन एकता संस्थेचे अमोल शितोळे यांनी केले आहे.

