पनवेल, दि.5 (वार्ताहर) कामोठे (4kNews)ः कळंबोली सर्कल येथील मुंब्रा पनवेल महामार्गावर बांधलेला उड्डाणपुल हा सध्या अवजड वाहनांसाठी प्रतीक्षापूल बनला आहे. कळंबोली सर्कलवरील वाहतूक कोंडीचा प्रश्न वाहतूक पोलीस सोडवू न शकत असल्याने ही स्थिती निर्माण झाली आहे. या सर्कलवर वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी सात ते आठ पोलीस कर्मचारी आणि वाहतूक वार्डन पोलीसांच्या मदतीला असतानाही वाहनचालकांना कळंबोली सर्कलवर मोठ्या प्रमाणात कोंडीचा सामना करावा लागत आहे.

एकाच सर्कलवर 16 विविध रस्ते आपसात जोडले गेल्याने ही कोंडी होत असली तरी वाहतूक पोलीसांनी रस्त्यावर दंडात्मक कारवाई करण्यासोबत वाहतूक नियमन करण्याची मागणी वाहनचालकांकडून जोर धरत आहे.
कळंबोली सर्कलचा विस्तार पुढील काही वर्षांत होईल. यासाठी सरकार पाचशे कोटी रुपयांपेक्षा अधिक रक्कम खर्च करणार आहे. अडीच ते तीन वर्षे या कामासाठी लागणार असले तरी कळंबोली सर्कलवर सध्या मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीमुळे मुंब्रा बाजूकडून जेएनपीटी बंदर, मुंबई पुणे द्रुतगती महामार्ग आणि मुंबई गोवा या महामार्गाकडे जाणार्या वाहनांना कळंबोली गावासमोर बांधलेल्या उड्डाणपुलावर अनेक मिनिटांची प्रतीक्षा करावी लागत आहे. कळंबोली सर्कलप्रमाणे रोडपाली सिग्नल आणि नावडे गावासमोरील उड्डाणपुलाखाली वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात होते. दोन दिवसांपूर्वी ही कोंडी फोडण्यासाठी वाहतूक पोलीसांनी रस्ते विकास महामंडळाच्या अधिकार्यांसोबत चर्चा केली. मात्र यापूर्वीही अनेक चर्चा आणि प्रस्ताव पोलिसांकडून देऊनही वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटलेला नाही.

कामोठे येथील पथकर नाका (टोलनाका) खारघर येथे स्थलांतरित केल्यास नवी मुंबई आणि मुंबईच्या दिशेने पुण्याकडे जाण्यासाठी कामोठे टोलनाका चुकविणार्या अवजड वाहनांना थेट कळंबोली येथून द्रुतगती महामार्गावर जावे लागेल त्यामुळे रोडपाली सिग्नलवरील ताण कमी होईल असा जुनाच प्रस्ताव पुन्हा वाहतूक पोलिसांनी रस्ते विकास महामंडळासमोर मांडला. मात्र टोलनाका स्थलांतर करणे म्हणजे पुन्हा सरकारमधील वरिष्ठ अधिकार्यांची परवानगी आणण्याचा नवा पेच या प्रस्तावासमोर उभा राहिला आहे. मुंब्रा पनवेल महामार्गावर नावडे गाव ते रोडपाली सिग्नल आणि रोडपाली सिग्नल ते कळंबोली सर्कल या मार्गिकेवर 12 फुटी रस्त्याचे रुंदीकरण तातडीने करणे गरजेचे आहे. त्यावर सुद्धा या बैठकीत चर्चा झाली. वरिष्ठांकडे प्रस्ताव पाठवितो त्या प्रस्तावाला मंजूरी मिळाल्यानंतर निविदा आणि त्यानंतर प्रत्यक्ष काम या सर्व प्रक्रियेत हा रुंदीकरणाचा प्रस्ताव अडकण्याची चिन्हे आहेत.

रोडपाली सिग्नल येथील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी नावडे गावासमोरील उड्डाणपुल थेट खिडुकपाडा गावाच्या पुढेपर्यंत वाढविल्यास मोठी समस्या सुटेल असेही वाहतूक पोलीसांनी सूचविले मात्र यावर पुन्हा प्रस्ताव पाठविला आहे त्यास मंजूरी मिळाली नसल्याचे रस्ते विकास महामंडळाच्या अधिकार्यांनी सांगितले. सरकार कळंबोली सर्कलच्या सर्व रस्त्याची वाहतूक कोंडी फोडण्यासाठी 500 कोटी रुपये खर्च करुन नवीन पुलाचे जाळे उभारत आहे.
