पनवेल, दि.28 (4kNews) ः सरत्या वर्षाला निरोप आणि नववर्षाचे स्वागत करण्यासाठी पनवेल नगरी सज्जहोऊ लागली आहे. काही दिवसांवर ’थर्टी फर्स्ट’ आल्याने राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून गोवा वरून येणार्या वाहनावर तसेच अवैध, चोरटी मद्य विक्री रोखण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाने भरारी पथके पनवेल परिसरात तैनात केली आहेत.

थर्टी फर्स्टला सरत्या वर्षाला निरोप आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी तरुणाई सज्ज झाली आहे.पनवेल परिसरात मोठ्या प्रमाणात फॉर्म हाऊस असल्यामूळे मित्र मंडळीकडून थर्टी फस्ट साजरा करण्यासाठी बेत आखले जात आहेत. विशेष म्हणजे गोवा येथे दारू स्वस्त उपलब्ध होत असल्यामुळे मित्र मंडळी तसेच चोरीने दारू विक्री करणारे दारू विक्रेते, चायनीज विक्रेते, ढाबा तसेच बहुतांश नागरिक हे गोवा वरून स्वस्त दरात मद्य घेवून येण्याची शक्यता अधिक असल्यामुळे राज्य उत्पादन शुल्क विभागाची मद्य तस्करावर करडी नजर राहणार आहे.

उत्पादन शुल्क विभागाने गोवा वरून येणार्या वाहनावर नजर ठेवण्यासाठी पथक तयार केले आहे. विशेष म्हणजे पनवेल पालिका हद्दीतील ग्रामीण परिसर तसेच खारघर , कामोठे, कळंबोली नवीन पनवेल आदी भागात अवैधपणे दारू विकेत्यावर कारवाई करण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून नियोजन करण्यात आले आहे.
