पनवेल (प्रतिनिधी) उदयोन्मुख खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी भारतीय जनता युवा मोर्चा पनवेलतर्फे पनवेल विधानसभा मतदार संघात माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, लोकप्रिय आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, भाजपचे जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, पनवेल महानगरपालिकेचे माजी सभागृहनेते परेश ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली नमो चषक २०२५ क्रीडा महोत्सव अंतर्गत आयोजित करण्यात आलेल्या फुटबॉल स्पर्धेत एसएसएफए बी संघाची किक सरस ठरली. या संघाने ४२० या संघावर मात करून फुटबॉल चषक पटकाविला. तर तृतीय क्रमांकावर एसबीएससी संघाला समाधान मानावे लागले.

कामोठेतील लोकनेते रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलच्या मैदानावर झालेल्या या स्पर्धेला लोकप्रिय आमदार प्रशांत ठाकूर, युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष अनुप मोरे, भाजपचे जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील यांची प्रमुख उपस्थिती लाभली. स्पर्धेचे उदघाटन माजी नगरसेवक विजय चिपळेकर व माजी नगरसेवक हेमलता गोवारी यांच्या हस्ते झाले.

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून माजी नगरसेवक अजय बहिरा,भाऊ भगत, रवी गोवारी, कामोठे महिला मोर्चाच्या अध्यक्षा वनिता पाटील, भाजपचे शहर सरचिटणीस हर्षवर्धन पाटील, मनोहर शिंगाडे, साधना आचार्य, तसेच स्पर्धा समन्वयक युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष मयुरेश नेतकर, सरचिटणीस अभिषेक भोपी, कामोठे अध्यक्ष तेजस जाधव यांच्यासह युवा मोर्चाचे पदाधिकारी उपस्थित होते.

या स्पर्धेत १६ संघांनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेतील विजेत्या संघाला २० हजार रुपये, द्वितीय क्रमांकास १० हजार रुपये तर तृतीय क्रमांकाला ५ हजार रुपये आणि सर्व विजेत्या संघास प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. स्पर्धेचे उत्तम नियोजन या ठिकाणी होते. भव्य स्वरूपात झालेल्या या स्पर्धेच्या निमित्ताने खेळाडूंना एक व्यासपीठ मिळाले. त्यामुळे खेळाडूंनी या स्पर्धेच्या आयोजनाबद्दल आयोजकांना धन्यवाद दिले.
