पनवेल (प्रतिनिधी) धनुर्विद्या खेळाडू सिद्धी विश्वास देशमुख हिला अर्चरी अर्थात तिरंदाजी साहित्यासाठी श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्यावतीने दीड लाख रुपयांची आर्थिक मदत करण्यात आली असून सदरचा धनादेश मंडळाचे उपाध्यक्ष व भाजपचे तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते आज (दि. ११) सिद्धीला प्रदान करण्यात आला. यावेळी भाजपचे पळस्पे विभागीय अध्यक्ष अनेश ढवळे, अनिल कोळी, अंकुश पाटील, विश्वास देशमुख आदी उपस्थित होते.

पनवेलची सिद्धी देशमुख हि धनुर्विद्या स्पर्धेत सहभाग घेत असते. तिने मुंबई विभागीय स्पर्धेत सुवर्णपदक, आंतरविभागीय स्पर्धेत कांस्यपदक, द्रोणा कप स्पर्धेत सांघिक कांस्यपदक अशी विविध पदके तिने पटकाविले आहेत. आगामी स्पर्धांकरिता तिच्याकडे आधुनिक तिरंदाजी साहित्याची आवश्यकता होती, त्या अनुषंगाने तिचे वडील विश्वास देशमुख यांनी या संदर्भात मदतीसाठी मंडळाकडे मागणी केली होती. त्या अनुषंगाने माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आमदार प्रशांत ठाकूर, उपाध्यक्ष अरुणशेठ भगत, व सचिव परेश ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत असलेल्या श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक मंडळाच्यावतीने आर्थिक मदत करण्यात आली.

आगामी स्पर्धांसाठी तिला आवश्यक असलेल्या आधुनिक तिरंदाजी साहित्याच्या मदतीसाठी श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाने दीड लाख रुपयांची मदत दिली. यामुळे सिद्धीच्या खेळातील प्रगतीस आणखी चालना मिळणार आहे. सिद्धीच्या वडिलांनी मदतीसाठी मंडळाकडे केलेल्या मागणीला प्रतिसाद देत, मंडळाने आर्थिक सहाय्य दिले, जे निश्चितच तिच्या भविष्याच्या स्पर्धांमध्ये उपयुक्त ठरणार असून आमदार प्रशांत ठाकूर यांनी सिद्धीला पुढील यशस्वी वाटचालीकरीता शुभेच्छा दिल्या आहेत.
