पनवेल दि.२७(वार्ताहर): कर्नाळा स्पोर्ट्स अकॅडमी, बार्न्स कॉलेज ऑफ आर्ट्स, सायन्स अँड कॉमर्स,पनवेल.महाविद्यालयाच्या मराठी वाङ्मय विभागाच्या वतीने मराठी भाषा गौरव दिन उत्साहात आणि अभिमानाने साजरा करण्यात आला. २७ फेब्रुवारी हा ज्येष्ठ कवी कुसुमाग्रज यांच्या जयंतीचा दिवस, जो मराठी भाषेच्या गौरवासाठी समर्पित आहे. मराठीच्या समृद्ध परंपरेचा सन्मान राखत, विद्यार्थ्यांना भाषेच्या जतन व संवर्धनाची जाणीव करून देण्यासाठी हा विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य कल्पेश कृष्णा भोईर होते. प्रा. प्रशांत पाटील यांनी कार्यक्रमाच्या उद्देशाचे सुंदर प्रास्ताविक केले, तर सूत्रसंचालनाची जबाबदारी प्रा. रूपाली अहिवले यांनी अत्यंत प्रभावीपणे सांभाळली. मराठी भाषेच्या भवितव्यावर प्रकाश टाकण्यासाठी आणि तरुणांना विचारमंथनासाठी प्रवृत्त करण्यासाठी वकृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मराठी भाषा आणि आपली ओळख, मराठी भाषा जपण्यासाठी तरुण पिढीची भूमिका, मराठीतून शिक्षण गरजेचे का? या विषयांवर विद्यार्थ्यांनी प्रभावी विचार मांडले. स्पर्धेत अनेक विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.

विशेषतः कु. पल्लवी पडवणकर, कु. मानसी मोरे आणि कु. कोमल दुर्गे यांनी प्रभावी भाषण सादर करून उपस्थितांची मने जिंकली. विद्यार्थ्यांनी मराठी भाषेच्या समृद्धतेविषयी तसेच तिच्या जतनासाठी आवश्यक उपाययोजनांविषयी महत्त्वपूर्ण विचार मांडले. विद्यार्थ्यांचा प्रचंड प्रतिसाद आणि भाषेवरील प्रेम पाहून महाविद्यालयातील प्राध्यापकवर्ग भारावून गेला. कार्यक्रमाच्या शेवटी, सर्वांनी मराठी भाषेच्या संवर्धनासाठी कटिबद्ध राहण्याचा निर्धार केला.
