पनवेल दि.११(प्रतिनिधी):”भावभावनांचा कल्लोळ प्रत्येकाच्या मनात असतो.त्याला शब्दरूप मिळून त्याचे प्रकटीकरण होण्यासाठी प्रत्येकाने लिहिते झाले पाहिजे.” असे भावपूर्ण उद्गार ज्येष्ठ गजल- कार ए.के.शेख यांनी काढले.येथील के. गो.लिमये सार्वजनिक वाचनालय व ग्रंथालय आणि कोकण मराठी साहित्य परिषद- शाखा पनवेल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित काल,शनिवारी वाचनालयाच्या सभागृहात झालेल्या पुस्तक प्रकाशन सोहळ्यात ते बोलत होते.

ते पुढे म्हणाले,” पनवेलनगरी लेखकनगरी होत आहे ही चांगली गोष्ट आहे.काशिनाथ जाधव यांनी ‘भारत देशाचे महान नेते’या पुस्तकात १९नेत्यांचा परिचय करून दिला आहे. त्यातील १५ नेते भारतरत्न पुरस्कारांनी सन्मानित आहेत. आपल्याला नेत्यांची केवळ नावे माहीत असतात, पण त्यांच्याबद्दल फारच थोडी माहिती असते. देशातील महान नेत्यांच्या माहितीची गरज हे सुंदर पुस्तक भरून काढते. त्या दृष्टीने काशिनाथ जाधव यांनी फार मोठे कार्य केले आहे.त्यांची साहित्यिक म्हणून वाटचाल आता सुरू झाली आहे. त्यांच्या पुस्तकाचे प्रकाशन झाले, असे मी जाहीर करतो.”

ॲड.सुनीता जोशी लिखित ‘माझ्या जन्माची गोष्ट’ या कादंबरीचे प्रकाशन जनसंवादिनी ठाणे संस्थेचे संस्थापक, व्याख्याते व प्रशिक्षक योगेशचंद्र लोहकरे यांच्या हस्ते झाले. प्रकाशन प्रसंगी ते म्हणाले,”ॲड. सुनीता जोशी यांनी विविध प्रकारचे लेखन केले असून त्या संवेदनशील लेखिका आहेत. त्यांनी नाट्यछटा लिहिल्या, पण त्या नाटकी नाहीत. अनेक साहित्य संमेलनात त्यांचा सहभाग असतो. या कादंबरीत बंडखोरी नाही,त्यामुळे हे दलित साहित्य प्रकारात मोडत नाही. मात्र प्रत्येक जाती- जमातीचे किमान एक तरी पुस्तक प्रसिद्ध होईल, तेव्हा आपणास त्यांच्या असहाय्यतेची, उद्रेकाची व संघर्षाची माहिती होईल.

तसेच विस्थापितांचे व दंगलपीडितांचेआक्रंदन लेखकांनी समाजापुढे आणावे.”
कृत्रिम बुद्धिमत्तेविषयी बोलताना ते म्हणाले,” कृत्रिम बुद्धिमत्तेला संवेदनशीलता नसते. पण त्यातील तांत्रिक बाबींचा आवश्यकतेनुसार उपयोग करून घ्यावा.”
मराठी भाषेला अभिजीत भाषेचा दर्जा प्राचीनता, मौलिकता, सातत्य, संस्कृतिक वारसा इत्यादी निकषांद्वारे प्राप्त झाल्याची माहिती त्यांनी दिली.
वाचनालयाचे सभागृह अनेक मान्यवर रसिक श्रोत्यांनी भरून गेले होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ॲड. माधुरी थळकर यांनी ओघवत्या भाषेत केले.
लेखक -द्वयीनी पुस्तक लेखनाविषयी आपल्या भूमिका विशद केल्या.
ए.के. शेख यांचा परिचय राजकुमार ताकमोगे यांनी, तर योगेशचंद्र लोहकरे यांचा परिचय विशाल पवार यांनी करून दिला. मुद्रक प्रशांत चातुर्य यांना यथोचित सन्मानित करण्यात आले.
“वाचलेली पुस्तके व भेटलेली माणसे आयुष्य घडवतात.” अशी समर्पक सुरुवात करून कार्यक्रमाचे अध्यक्ष रोहिदास पोटे यांनी “लेखक हा संवेदनशील माणूस असतो. तो तादात्म्य, एकरूपता व परकाया प्रवेशाच्या सहाय्याने लेखन कृतीची निर्मिती करतो.” असे प्रतिपादन केले.
को.म.सा.प. पनवेल शाखेचे सहसचिव राजकुमार ताकमोगे यांच्या आभार प्रदर्शनाने या सुरेख साहित्यिक कार्यक्रमाची सांगता झाली.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी के.गो.लिमये वाचनालयाच्या ग्रंथपाल निकिता शिंदे,सहाय्यक ग्रंथपाल संपदा जोशी, लिपिक हर्षिता तुरकर व सेवक संजय दिवटे यांनी विशेष परिश्रम घेतले.
