*करंजाडे:* रविवार, २५ मे २०२५ रोजी करंजाडे नगरीत इतिहासात पहिल्यांदाच पाच महान संतांच्या पवित्र पादुकांचा दर्शन सोहळा मोठ्या भक्तीमय आणि उत्साहात पार पडला. सेक्टर ४ येथील खुल्या मैदानात आयोजित या सोहळ्याने करंजाडे नगरी खऱ्या अर्थाने पावन झाली आणि आध्यात्मिक वातावरणात न्हाऊन निघाली.
श्री स्वामी समर्थ नित्य सेवा संस्था करंजाडे यांच्या अथक प्रयत्नांतून हा भव्य सोहळा यशस्वी झाला. या सोहळ्यात श्रीपाद श्रीवल्लभ निर्गुण पादुका, सद्गुरू श्री स्वामी समर्थ महाराज निर्गुण पादुका, सद्गुरू श्री गजानन महाराज पादुका, श्री. शंकर महाराज (धनकवडी) पादुका, सद्गुरू श्री शिवाजी महाराज पादुका आणि राम सेतू मधील पवित्र शिळा यांचे भाविकांना अगदी जवळून दर्शन घेता आले.

सकाळपासूनच सोहळ्याला सुरुवात झाली. श्री स्वामी समर्थ नित्य सेवा संस्थेच्या सदस्यांनी विधिवत पादुका पूजन, दत्तायाग आणि पारायण असे धार्मिक विधी भक्तीभावाने संपन्न केले. यावेळी श्री स्वामी समर्थ भजनी मंडळ, कोल्हापूर यांनी सादर केलेल्या जोशपूर्ण भजनांनी संपूर्ण परिसर भारून गेला होता, ज्यामुळे वातावरणात अधिकच चैतन्य निर्माण झाले.

या सोहळ्याला करंजाडे नगरीतील भाविकांसह पनवेल, उरण आणि नवी मुंबई अशा विविध भागातून मोठ्या संख्येने भाविकांनी उत्स्फूर्तपणे उपस्थिती लावली. सर्वांनी दिलेल्या सहकार्यामुळे हा कार्यक्रम खऱ्या अर्थाने यशस्वी झाला. तसेच, श्री स्वामी समर्थ नित्य सेवा संस्थेचे वरिष्ठ गुरुवर्य मंडळी आणि करंजाडेमधील इतर सेवा संस्थांचे मार्गदर्शन व सहकार्य मोलाचे ठरले.

या यशस्वी सोहळ्यावेळी श्री स्वामी समर्थ नित्य सेवा संस्था , करंजाडेचे
श्री.सुनिल रखमाजी जांभळे – अध्यक्ष
श्री.संदीप भास्कर चव्हाण – सचिव
सौ.रामेश्वरी सुनिल जांभळे – खजिनदार
सौ.प्रिया हेमंत मालंडकर – उपाध्यक्ष
श्री.राजेश रामचंद्र वायंगणकर – उपसचिव
श्री.प्रशांत कृष्णा घाटे – उप खजिनदार
श्री.विश्वास वि. चव्हाण – सल्लागार
श्री.सचिन सुभाष काटकर – सदस्य
श्री.विनायक अर्जुन मढवी – सदस्य

तसेच संस्थेचे इतर सदस्य व सेवेकरी उपस्थित होते. त्यांच्या अथक परिश्रमामुळे आणि समस्त भाविकांच्या सहभागामुळे हा पादुका दर्शन सोहळा करंजाडे नगरीच्या इतिहासात सुवर्ण अक्षरांनी कोरला गेला.
