पनवेल, दि. १९ (वार्ताहर):
पनवेल महानगरपालिकेच्या मालमत्ता करावरील शास्ती माफीची अभय योजना अखेर लागू झाली असून, त्यामुळे शहरातील नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. ही योजना लागू व्हावी म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मागील वर्षभर सातत्याने पाठपुरावा करण्यात येत होता, अशी माहिती शिवसेना जिल्हाप्रमुख रामदास शेवाळे यांनी दिली.

कळंबोलीतील पत्रकार परिषदेत त्यांनी सांगितले की, नागरिकांची जुनी मागणी मान्य करून आयुक्त मंगेश चितळे यांनी हा निर्णय घेतला आहे. यासाठी खासदार श्रीरंग बारणे, आमदार प्रशांत ठाकूर, महानगरप्रमुख ऍड. प्रथमेश सोमण यांच्यासह शिवसेना पदाधिकाऱ्यांनी शासन दरबारी प्रयत्न केले.

महानगरप्रमुख प्रथमेश सोमण यांनी हा निर्णय इतिहासिक असल्याचे सांगत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि महायुती सरकारचे आभार मानले. उपजिल्हाप्रमुख परेश पाटील यांनी या योजनेचा ग्रामीण आणि शहरी भागातील नागरिकांना थेट लाभ होईल असे सांगितले.
