4k समाचार
पनवेल दि. १० ( वार्ताहर ) : पनवेल शहरातील तक्का गाव परिसरात गाड्यांचे सायलेन्सर चोरीला जाण्याचे प्रकार वाढल्याने वाहन मालक चांगलेच त्रस्त झाले आहेत .
येथील तिघा जणांच्या गाड्यांचे सायलेन्सर चोरीला गेले आहेत. सदर चोरटे परिसरात सीसी टीव्ही फुटेज मध्ये कैद झाले आहेत . या बाबतची माहिती पोलीस ठाण्याला सुद्धा देण्यात आली आहे . वाढत्या चोऱ्यांच्या घटना मुळे आता ग्रामस्थांयाना व गावातील यूवकांना आता रात्री जागता पहारा ठेवणे गरजेचे झाले आहे .

पनवेल शहर पोलिसांचा गुन्हेगारांनी घेतला धसका; गेल्या महिन्यात ३८ गुन्हे उघडकीस, ५७ जणांना अटक, ७१ लाखांचा मुद्देमाल जप्त
पनवेल दि. १० ( वार्ताहर ) : पनवेल शहर पोलीस ठाण्याने जुलै महिन्यामध्ये एक उल्लेखनीय कामगिरी करत ३८ गंभीर गुन्हे उघडकीस आणून त्यातील ५७ जणांना गजाआड केले आहे. पोलिसांनी उघडकीस आणलेल्या गुन्ह्यांमध्ये चोरी, जबरी चोरी, घरफोडी, फसवणूक आणि अमली पदार्थांशी संबंधित गुन्ह्यांचा समावेश असून, पोलिसांनी त्यांच्याकडून एकूण ७१ लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. पोलिसांच्या या कारवाईबद्दल या भागातील नागरिकांकडून त्यांचे कौतुक होत आहे.

या कारवायांमध्ये पोलिसांनी पनवेल येथील एका कुटुंबाला शेतातून गुप्तधन काढून देण्याच्या बहाण्याने त्यांचे ३९ लाख ७० हजार रुपये किमतीचे सोने आणि रोख रकमेची फसवणूक करणाऱ्या भोंदूबाबाला पनवेल शहर पोलिसांनी कोल्हापूर जिल्ह्यातून अटक करून त्याने फसवणूक केलेले सर्व दागिने व रोख रक्कम पोलिसांनी जप्त केली आहे. दुसऱ्या गुन्ह्यात आयफोन चोरुन नेणाऱ्या चोरट्याचा पाठलाग करत ओडिशातील त्याच्या मूळगावी जाऊन अटक केली. या कारवाईत पोलिसांनी पुराने वेढलेल्या गावात फायर ब्रिगेडच्या मदतीने ८ किमी. पाण्यातून प्रवास करत त्याला ताब्यात घेत त्याच्याकडून ७ लाख २४ हजार ५०० रुपये किमतीचे ५ आयफोन जप्त केले. पनवेल बस स्थानक परिसरात प्रवाशांना लिफ्ट देण्याच्या बहाण्याने लुटणाऱ्या टोळीला अटक करत २ लाख २७ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

तसेच, रेल्वे स्थानक परिसरात बॅग चोरणाऱ्या टोळीतील ५ आरोपींना अटक करून ११ लाख ६७ हजार रुपये किमतींचा मुद्देमाल हस्तगत केला. त्यातून २ गुन्हे उघडकीस आले. नवी दुकानांचे शटर उचकटून चोरी करणाऱ्या टोळीला ताब्यात घेत त्यांच्याकडून ४ लाख ९५ हजार ८१० रुपये किमतीचे ४५ मोबाईल जप्त करत पोलिसांनी ४ गुन्हे उघडकीस आणले . नवी मुंबई पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे, सहआयुक्त संजय येनपुरे, परिमंडळ ३ चे पोलीस उपायुक्त प्रशांत मोहिते आणि पनवेल विभागाचे सहाय्यक आयुक्त भाऊसाहेब ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली या साऱ्या कारवाया पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वपोनि. नितीन ठाकरे, पोनि. (गुन्हे) शाकीर पटेल, पोनि. (प्रशासन) अभिजीत अभंग यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्यांनी ही कामगिरी यशस्वी केली.
