4k समाचार दि. 20
पनवेल (प्रतिनिधी) शिक्षक दिनाचे औचित्य साधून इनरव्हील क्लब पनवेलच्या वतीने नवीन पनवेल येथील सीकेटी विद्यालयातील शिक्षकांचा सन्मान सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्त्व घडविण्यात तसेच समाजाला योग्य दिशा देण्यात शिक्षकांची महत्त्वपूर्ण भूमिका असल्याची जाणीव ठेवून हा उपक्रम राबविण्यात आला.या सोहळ्यात सीकेटी विद्यालयातील दहा शिक्षकांचा प्रमाणपत्र देऊन व त्यांच्या कार्याचा गौरव करून सन्मान करण्यात आला.


यावेळी प्रत्येक शिक्षकांना ज्ञानयात्रेचे प्रतीक म्हणून पुस्तक, प्रेरणेचे प्रतीक म्हणून पेन, आनंदाचे प्रतीक म्हणून मिठाई व मंगलमयतेचे प्रतीक म्हणून श्रीफळ प्रदान करण्यात आले. सन्मान स्वीकारताना शिक्षकांनी इनरव्हील क्लबच्या या उपक्रमाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. उपस्थितांच्या मनात आपुलकी, आदर व परस्पर सन्मानाची भावना या कार्यक्रमातून अधिक दृढ झाली. या सोहळ्याची सांगता अल्पोपहार व समूह छायाचित्राने करण्यात आली. शिक्षक हे केवळ ज्ञानदान करणारे नसून विद्यार्थ्यांच्या जीवनाचा पाया रचणारे शिल्पकार आहेत. विद्यार्थ्यांना योग्य दिशा देऊन समाज घडविण्याचे पवित्र कार्य शिक्षक करतात. त्यामुळे इनरव्हील क्लब पनवेलने शिक्षकांचा सन्मान करत आणखी एक स्त्युत्य उपक्रम यशस्वीपणे राबविला.