4k समाचार दि. 5
पनवेल (प्रतिनिधी) आत्मनिर्भर भारतमुळे देशाची ताकद वाढणार असून त्या जोरावर आपला भारत विकसित देशांच्या यादीत सामील होईल, असे प्रतिपादन आत्मनिर्भर भारत संकल्प अभियानाच्या प्रदेश सहसंयोजिका वसई मतदार संघाच्या आमदार स्नेहा दुबे-पंडित यांनी आज (दि. ०३) येथे केले. भारतीय जनता पार्टीच्या वतीने आत्मनिर्भर भारत संकल्प अभियान २५ सप्टेंबर ते २५ डिसेंबर दरम्यान राबविण्यात येणार आहे. त्या संदर्भातील उत्तर रायगड जिल्हा कार्यशाळा आमदार स्नेहा दुबे – पंडित आणि भाजपचे ठाणे कोकण समन्वयक अभिजित पेडणेकर व भाजपचे जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी यांच्या प्रमुख उपस्थितीत मार्केट यार्ड येथे पार पडली.

आमदार स्नेहा दुबे – पंडित यांनी या कार्यशाळेत संवाद साधत या अभियानाचे महत्व अधोरेखित केले. त्यांनी पुढे बोलताना सांगितले कि, आपला देश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली जलदगतीने विकास करत आहे. देशाच्या सर्वांगीण विकासासाठी सुरू केलेल्या “आत्मनिर्भर भारत संकल्प अभियानातून स्वदेशीचा गजर होणार आहे. या अभियानाचा उद्देश भारताला सर्व क्षेत्रात स्वयंपूर्ण बनवणे तसेच रोजगारनिर्मिती, उद्योगविकास आणि स्थानिक उत्पादनांना चालना देणे हा आहे. या अभियानांतर्गत ‘लोकल फॉर व्होकल’ हा मंत्र देत स्थानिक उत्पादक व उद्योजकांना प्रोत्साहन दिले जात आहे. कृषी, उद्योग, आरोग्य, शिक्षण, तंत्रज्ञान आणि लघु-मध्यम उद्योग क्षेत्रात विशेष भर देण्यात आला आहे. शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञान, तर युवकांना स्टार्टअपसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देणे, हा या उपक्रमाचा महत्त्वाचा भाग आहे. आत्मनिर्भर भारत संकल्प अभियान हे केवळ सरकारी धोरण नसून प्रत्येक नागरिकाचा सहभाग असलेले एक सामूहिक चळवळ आहे.

स्वदेशी उत्पादनांचा वापर वाढवून, स्थानिक उद्योगांना प्रोत्साहन देऊन आणि आयातीत घट करून भारताला जागतिक अर्थव्यवस्थेत मजबुती देण्याचा यातून प्रयत्न केला जात आहे. या अभियानामुळे ग्रामीण आणि शहरी भागात उद्योगसंधी वाढत असून, रोजगारनिर्मितीला चालना मिळत आहे. देश स्वयंपूर्ण होण्याच्या दिशेने हा उपक्रम एक महत्त्वाचे पाऊल ठरणार आहे, त्यामुळे प्रत्येकाने स्वदेशी वस्तूंचा वापर केला पाहिजे, असेही त्यांनी यावेळी नमूद केले.
यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी यांनी आपल्या भाषणातून आत्मनिर्भर भारत हि काळाची गरज असल्याचे म्हंटले. पक्षाकडून देण्यात आलेली जबाबदारी आपण सर्वजण यशस्वीपणे पार पाडत असल्याचे सांगून आत्मनिर्भर भारत संकल्प अभियान यशस्वी करू या, असे आवाहन केले.

या कार्यशाळेला प्रमुख मान्यवर म्हणून भाजपचे राज्य परिषद सदस्य अरुणशेठ भगत, रायगड जिल्हा सरचिटणीस व आत्मनिर्भर भारत संकल्प अभियानाचे जिल्हा संयोजक नितीन पाटील, जिल्हा सरचिटणीस ऍड. प्रकाश बिनेदार. दीपक बेहेरे, चारुशीला घरत, जिल्हा उपाध्यक्ष प्रल्हाद केणी, रवी भोईर, वासुदेव घरत, महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्षा प्रिया मुकादम, युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष आनंद ढवळे, आत्मनिर्भर भारत संकल्प अभियानाचे जिल्हा संयोजक निलेश म्हात्रे यांच्यासह विविध मंडल अध्यक्ष, जिल्हा कार्यकारिणी पदाधिकारी, सदस्य उपस्थित होते.
