4 k समाचार दि. 14
पनवेल (प्रतिनिधी) रोटरी क्लब ऑफ पनवेल सेंट्रल चॅरिटेबल ट्रस्ट आणि महापालिका यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी (दि. 12) साईनगर येथे फुलपाखरू उद्यान भूमिपूजनाचा तसेच रोटरी घनदाट जंगल प्रकल्पाचा तिसरा वर्धापन दिन सोहळा उत्साहात झाला. या वेळी फुलपाखरू उद्यानाचे भूमिपूजन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते झाले. ‘रोटरी’चे माजी प्रांतपाल डॉ. गिरीश गुणे यांच्या मार्गदर्शनाखालील या उपक्रमामुळे पनवेलच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे.

या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून आमदार प्रशांत ठाकूर, माजी आमदार बाळाराम पाटील, भाजपचे ज्येष्ठ नेते जे.एम. म्हात्रे, वाय.टी. देशमुख, शिवसेना उबाठा गटाचे नेते बबन पाटील, महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर, माजी नगरसेवक नितीन पाटील, मनोहर म्हात्रे, गणेश कडू, डॉ. अरुणकुमार भगत, जयंत पगडे, माजी नगरसेविका दर्शना भोईर, डॉ. सुरेखा मोहोकर, प्रीती जॉर्ज, सारिका भगत, महिला मोर्चा शहराध्यक्ष रूचिता लोंढे, अतिरिक्त आयुक्त गणेश शेट्ये, उपायुक्त विधाते आदी उपस्थित होते.

या वेळी बोलताना लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी डॉ. गिरीश गुणे यांच्या उपक्रमाचे कौतुक करत म्हटले की, डॉ. गुणे यांनी पनवेलकरांसाठी अनेक समाजोपयोगी प्रकल्प उभे केले. ज्या पद्धतीने ते रुग्णांची काळजी घेतात; त्याच प्रेमाने आणि जबाबदारीने त्यांनी झाडांची देखभाल केली. घनदाट जंगल प्रकल्प पाहिल्यावर असे वाटते की, तो सहा-सात वर्षांपूर्वी सुरू झाला, इतकी झाडांची उत्कृष्ट वाढ झाली आहे. फुलपाखरू उद्यानही शहरवासीयांच्या पसंतीस उतरेल, असा मला विश्वास आहे.
या वेळी लोकनेते ठाकूर यांनी फुलपाखरू उद्यान प्रकल्पासाठी पाच लाखांची, तर विस्टा फूटतर्फे सल्लागार चंद्रशेखर सोमण यांनी 10 लाख रुपयांची मदत जाहीर केली.
