पनवेल शहर वाहतूक शाखेच्या सतर्कतेमुळे केरळमधून चोरीस गेलेली दुचाकी हस्तगत

4kNews कामोठे

पनवेल, दि. 30 : पनवेल शहर वाहतूक शाखेच्या सतर्कतेमुळे केरळ राज्यातून चोरीस गेलेली दुचाकी हस्तगत करण्यात यश आले आहे. या कार्यवाहीमुळे वाहतूक शाखेच्या दक्षतेचे सर्वत्र कौतुक होत आहे.
पनवेल शहर वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक औदुंबर भा. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सोमवार, दि. २९ जून २०२६ रोजी पोलीस हवालदार ६४ महेंद्रसिंग राजपूत व पोलीस नाईक २६९५ काळे हे नवीन पनवेल परिसरात क्रेन व्हॅनद्वारे गस्त घालत होते. त्यावेळी पनवेल रेल्वे स्थानकाच्या पूर्व बाजूस ‘नो पार्किंग’मध्ये उभी असलेली केएल ६१ ई ४६२४ क्रमांकाची मोटारसायकल आढळून आली. 


सदर वाहनावर कायदेशीर कारवाईची प्रक्रिया सुरू असताना वाहनधारकाशी मोबाईलद्वारे संपर्क साधण्यात आला. चौकशीदरम्यान संबंधित मोटारसायकल केरळ राज्यातील त्रिशूर पोलीस ठाणे हद्दीतून चोरीस गेल्याचे समोर आले. तसेच गुन्हा रजिस्टर क्रमांक ०४९१/२०२६, दिनांक १३ जून २०२६ रोजी या चोरीप्रकरणी गुन्हा दाखल असल्याचे निष्पन्न झाले.
यानंतर तात्काळ त्रिशूर पोलीस ठाण्याशी संपर्क साधून संपूर्ण माहिती देण्यात आली. तसेच संबंधित वाहन नियमानुसार ताब्यात घेऊन पुढील कायदेशीर कार्यवाहीसाठी आवश्यक प्रक्रिया सुरू करण्यात आली.

पनवेल शहर वाहतूक शाखेच्या सतर्कतेमुळे आंतरराज्य स्तरावरील चोरीस गेलेली दुचाकी शोधण्यात यश आल्याने नागरिकांकडून या उल्लेखनीय कार्यवाहीचे कौतुक करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top