पनवेल शहर पोलीस ठाण्याच्या वपोनि पदी बाळा कुंभार तर उरण पोलीस ठाण्याच्या वपोनि पदी पृथ्वीराज घोरपडे


4kNews कामोठे

पनवेल, दि.30  (संजय कदम) ः नवी मुंबई पोलीस आयुक्तालयातील पोलीस उपनिरीक्षक आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी जारी केले आहेत. प्रशासकीय कारणास्तव करण्यात आलेल्या या बदल्यांमुळे विविध पोलीस ठाण्यांमध्ये नव्याने जबाबदाऱ्या सोपविण्यात आल्या आहेत. कर्तव्यदक्ष, अनुभवी आणि शिस्तप्रिय अधिकारी म्हणून ओळख असलेले पोलीस निरीक्षक बाळा रघुनाथ कुंभार यांची पनवेल शहर पोलीस ठाण्याच्या प्रभारी पोलीस निरीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तर उरण पोलीस ठाण्याच्या वपोनि पदी पृथ्वीराज घोरपडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. 


मूळचे सातारा जिल्ह्यातील असलेले बाळा कुंभार यांनी सन २००५ मध्ये महाराष्ट्र पोलीस दलात प्रवेश केला. गेल्या दोन दशकांहून अधिक काळात त्यांनी विविध ठिकाणी उल्लेखनीय सेवा बजावत सक्षम, शिस्तप्रिय आणि जनतेशी प्रभावी संवाद साधणारे अधिकारी अशी ओळख निर्माण केली आहे.
सध्या ते नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या गुन्हे शाखेत सीसीटीएनएस अधिकारी म्हणून कार्यरत होते. त्याआधी त्यांनी ठाणे ग्रामीण पोलीस दलांतर्गत पडघा पोलीस ठाणे तसेच कल्याण तालुक्यातील टिटवाळा पोलीस ठाणे येथे वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हणून यशस्वीपणे जबाबदारी सांभाळली आहे. त्यांच्या कार्यकाळात गुन्ह्यांची प्रभावी उकल, कायदा व सुव्यवस्था राखणे आणि नागरिकांमध्ये पोलिसांबद्दल विश्वास निर्माण करणे या क्षेत्रांत त्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे.


या बदल्यांमुळे पोलीस प्रशासन अधिक सक्षम व गतिमान होण्यास मदत होणार असून, संबंधित अधिकाऱ्यांना तात्काळ नवीन पदस्थापनेच्या ठिकाणी रुजू होण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच रुजू झाल्याचा अनुपालन अहवाल पोलीस आयुक्तालयाकडे सादर करण्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे.
नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षमतेत वाढ करण्याच्या दृष्टीने ही नियमित प्रशासकीय बदली प्रक्रिया असल्याचे सांगण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top