नवीन बातम्या
प्रसिद्ध क्रिकेट प्रशिक्षक दिनेश लाड यांना रोटरीचा ‘व्होकेशनल एक्सलन्स अवॉर्ड २०२६’ प्रदान
संगीतसाधनेचा डिजिटल स्वरमंच; रायगड भूषण पं. उमेश चौधरी यांच्या वेबसाईटचे लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते उत्साहात अनावरण
पनवेल तालुका व शहर भाजपच्या मध्यवर्ती कार्यालयात आयोजित कार्यालयात ध्वजारोहण व ध्वजवंदन
कामोठेतील लोकनेते रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये स्वातंत्र्य दिन उत्साहात; आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते ध्वजारोहण
हजारो विद्यार्थ्यांना मोफत स्कूल बॅग, छत्री व वह्यांचे वाटप; स्वातंत्र्यदिनाच्या औचित्याने अशोक छाजेड चॅरिटेबल ट्रस्टचा स्तुत्य उपक्रम; विद्यार्थ्यांचे मनोबल वाढविणारा उपक्रम – आमदार महेश बालदी; ‘एकही आदिवासी बांधव कुड्याच्या घरात राहणार नाही’ – आमदार महेश बालदी
द्रोणागिरी नोडसाठी स्वतंत्र मतदान केंद्राची मागणी.
उरणच्या प्रियांशी पाटीलची आंतरराष्ट्रीय भरारी; सलग दोन वर्षे ‘एशियन मेडलिस्ट’चा मान
पंचरत्न इंग्लिश मीडियम स्कूल, पिरकोनच्या विद्यार्थ्याची शिष्यवृत्ती परीक्षेत उच्च भरारी.
उरण तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावून शाळेचा नावलौकिक वाढविला.

१५ ऑगस्ट रोजीचे उपोषण पूढे ढकलले
नवीन शेवा व शेवा कोळीवाडा गावच्या आक्रमकतेपुढे प्रशासन नरमले. विविध समस्यावर सकारात्मक चर्चा.
प्रशासनाकडून आश्वासन मिळाल्याने उपोषण तात्पुरते स्थगित.

हजारो विद्यार्थ्यांना मोफत स्कूल बॅग, छत्री व वह्यांचे वाटप; स्वातंत्र्यदिनाच्या औचित्याने अशोक छाजेड चॅरिटेबल ट्रस्टचा स्तुत्य उपक्रम; विद्यार्थ्यांचे मनोबल वाढविणारा उपक्रम – आमदार महेश बालदी; ‘एकही आदिवासी बांधव कुड्याच्या घरात राहणार नाही’ – आमदार महेश बालदी

4kNews कामोठे दि. 17

पनवेल (प्रतिनिधी) ‘शिक्षण हेच खरे सामर्थ्य’ या विचाराला केंद्रस्थानी ठेवून आर्थिकदृष्ट्या दुर्बल व गरजू विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वाटचालीला बळ देण्यासाठी अशोक छाजेड चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने आयोजित करण्यात आलेला भव्य शैक्षणिक साहित्य वाटपाचा सामाजिक उपक्रम स्वातंत्र्यदिनाच्या औचित्याने आज मोठ्या उत्साहात आणि आनंदमय वातावरणात संपन्न झाला. कर्जत फाटा येथील एन. डी. स्टुडिओ येथे आयोजित या कार्यक्रमात हजारो विद्यार्थ्यांना मोफत स्कूल बॅग, छत्री आणि वह्यांचे वाटप करण्यात आले. या उपक्रमास उरण-खालापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेश बालदी यांची प्रमुख उपस्थिती लाभली.


स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने आयोजित या कार्यक्रमाला माजी आमदार देवेंद्र साटम, भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, आयोजक अशोक छाजेड, सौ.संगीता अशोक छाजेड, उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल मेहुल, प्रांत अधिकारी प्रकाश सकपाळ, तहसीलदार अभय चव्हाण, एन डी स्टूडियो चे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रशांत साजणीकर, मुख्य लेखाधिकारी चित्रलेखा खातू, खालापूर पंचायत समितीचे सभापती कृष्णा पारंगे, जिल्हा परिषद सदस्या नेहा पारंगे, माजी जिल्हा परिषद सदस्य मोतीराम ठोंबरे, सरपंच रीतू ठोंबरे, सुधीर ठोंबरे, भाजपचे मंडल अध्यक्ष प्रवीण मोरे, अशोक छाजेड चॅरिटेबल ट्रस्ट चे उपाध्यक्ष संतोष खांडेकर यांच्यासह स्थानिक लोकप्रतिनिधी विद्यार्थी, पालक आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.  

आर्थिक परिस्थितीमुळे कोणत्याही विद्यार्थ्याच्या शिक्षणात अडथळा निर्माण होऊ नये, शैक्षणिक साहित्याअभावी विद्यार्थ्यांना अडचणींचा सामना करावा लागू नये आणि प्रत्येक विद्यार्थ्याला शिक्षणाच्या प्रवाहात आत्मविश्वासाने पुढे जाता यावे, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला. विद्यार्थ्यांना शाळेसाठी आवश्यक असलेले साहित्य एकाच वेळी उपलब्ध करून देत त्यांच्या शैक्षणिक वाटचालीला प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न या माध्यमातून करण्यात आला.शैक्षणिक साहित्य मिळाल्यानंतर विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर उमटलेला आनंद आणि उत्साह या उपक्रमाचे यश अधोरेखित करणारा ठरला. सामाजिक बांधिलकी जपत गरजू विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी मदतीचा हात देणारा हा उपक्रम समाजासाठी निश्चितच प्रेरणादायी असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.



विद्यार्थ्यांचे मनोबल वाढविणारा उपक्रम – आमदार महेश बालदी
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना आमदार महेश बालदी यांनी अशोक छाजेड चॅरिटेबल ट्रस्टच्या सामाजिक उपक्रमाचे मनापासून कौतुक केले. ते म्हणाले, “विद्यार्थ्यांचे मनोबल वाढविणारा हा उपक्रम आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात हा कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल आयोजकांचे मनःपूर्वक आभार. ८० व्या स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने आजचा दिवस विद्यार्थी आणि आपल्या सर्वांसाठी महत्त्वाचा आहे. आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने एन. डी. स्टुडिओ पाहण्याची संधी मिळणे ही विद्यार्थ्यांसाठी एक पर्वणीच आहे. एन. डी. स्टुडिओच्या पुनरुज्जीवनाचा उल्लेख करताना आमदार बालदी म्हणाले, “आमचे परममित्र नितीन चंद्रकांत देसाई यांच्या निधनानंतर हा स्टुडिओ ओसाड झाला होता. मात्र, नितीन देसाई यांच्यावर असलेले प्रेम आणि कलाकार म्हणून त्यांच्या आठवणी कायम स्मरणात राहाव्यात, यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि नामदार आशिष शेलार यांनी महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आणि या स्टुडिओला नवसंजीवनी दिली. त्याबद्दल मी त्यांचे मनःपूर्वक आभार मानतो.अशोक छाजेड यांच्या कुटुंबाशी असलेल्या जिव्हाळ्याच्या संबंधांचा उल्लेख करताना आमदार बालदी म्हणाले, “अशोक छाजेड यांच्या वडिलांपासून आमचे जिव्हाळ्याचे संबंध आहेत. सामाजिक उपक्रम करणे हे छाजेड कुटुंबाचे एक ध्येय राहिले आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात हा उपक्रम राबविण्यात आला आहे. समाजाबद्दलची आस्था या उपक्रमातून अधोरेखित झाली आहे. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेमध्ये मायक्रो प्लॅनिंग महत्त्वपूर्ण ठरले आहे.” अशा शब्दांत त्यांनी आयोजकांचे विशेष कौतुक केले.


‘वंदे मातरम्’चे गायन अभिमानाची बाब
स्वातंत्र्यदिनाचे महत्त्व अधोरेखित करताना आमदार महेश बालदी म्हणाले, “आज स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने देशाचा मानबिंदू असलेल्या लाल किल्ल्यावर पहिल्यांदाच ‘वंदे मातरम्’ गायले गेले आहे. ही सर्व भारतीयांसाठी अभिमानाची आणि ऊर भरून येणारी बाब आहे.”
देश विकासाच्या दिशेने वेगाने वाटचाल करीत असल्याचे सांगून त्यांनी या भागातील विविध विकासकामांचाही उल्लेख केला. “देश विकासात बदलत आहे. त्या अनुषंगाने अनेक प्रकल्प या भागात येत आहेत. जेएनपीटी चौक महामार्गाशी जोडला जाणार आहे. त्यामुळे येत्या काळात हा परिसर मुंबईला थेट जोडला जाणार असून, याचा मोठा फायदा विद्यार्थी, कामगार आणि नागरिकांना होणार आहे,” असे त्यांनी सांगितले.



‘एकही आदिवासी बांधव कुड्याच्या घरात राहणार नाही’
उरण मतदारसंघातील आदिवासी बांधवांच्या घरांच्या प्रश्नावरही आमदार महेश बालदी यांनी ठाम भूमिका व्यक्त केली. “माझ्या उरण मतदारसंघातील एकही आदिवासी बांधव कुड्याच्या घरात राहणार नाही, तो पक्क्या घरात राहील, यासाठी माझे कायम प्रयत्न आहेत. आणि हे मी पूर्ण करून दाखवीन,” अशी ठाम ग्वाही त्यांनी आपल्या भाषणातून दिली.


सामाजिक बांधिलकीचा आदर्श
अशोक छाजेड चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून राबविण्यात आलेल्या या उपक्रमातून सामाजिक बांधिलकीची भावना अधोरेखित झाली आहे. शिक्षणासाठी आवश्यक असणाऱ्या मूलभूत साहित्याची मदत देऊन गरजू विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देणे, त्यांच्या मनातील न्यूनगंड दूर करणे आणि त्यांना आत्मविश्वासाने शिक्षण घेण्यासाठी प्रेरित करणे, हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश आहे.समाजातील प्रत्येक घटकाने आपापल्या परीने गरजू विद्यार्थ्यांना मदतीचा हात दिल्यास शिक्षणाच्या माध्यमातून सामाजिक परिवर्तनाची प्रक्रिया अधिक गतिमान होऊ शकते. या भावनेतून अशोक छाजेड चॅरिटेबल ट्रस्टने सातत्याने सामाजिक उपक्रम राबविण्याची परंपरा कायम ठेवली आहे. स्वातंत्र्यदिनाच्या पवित्र पर्वावर विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला हातभार लावणारा हा उपक्रम केवळ शैक्षणिक साहित्य वाटपापुरता मर्यादित न राहता, ‘शिक्षण, संस्कार आणि सामाजिक बांधिलकी’ यांचा संदेश देणारा ठरला. हजारो विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर फुललेले आनंदाचे हास्य आणि त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी मिळालेली प्रेरणा हीच या उपक्रमाची खरी फलश्रुती ठरली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top