4kNews कामोठे दि. 1
पनवेल (प्रतिनिधी) भारतीय शास्त्रीय संगीत आणि सांस्कृतिक परंपरेचा समृद्ध वारसा जपण्याच्या उद्देशाने कार्यरत असलेल्या ‘संस्कृतीर दिशारी’ संस्थेच्या वतीने ‘मैफिल-ए-अनुराग’ या विशेष शास्त्रीय संगीत व नृत्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. प्रेमभावना, अनुराग आणि भारतीय शास्त्रीय संगीत यांचा सुरेल संगम घडविणारी ही विशेष मैफल रविवार, ६ सप्टेंबर २०२६ रोजी दुपारी ४ वाजता खारघर येथील पटेल हेरिटेज क्लबहाऊस, सेक्टर ११ येथे रंगणार आहे.

भारतीय शास्त्रीय संगीताच्या विविध अंगांचा आस्वाद रसिकांना एकाच व्यासपीठावर घेता यावा, या उद्देशाने या कार्यक्रमाची आखणी करण्यात आली आहे. शास्त्रीय गायनासोबतच वादन आणि कथक नृत्याची बहारदार सादरीकरणे या मैफिलीचे प्रमुख आकर्षण ठरणार आहेत. अनुभवी कलाकारांसोबतच गुणी नवोदित कलाकारांच्या सहभागामुळे कार्यक्रमाला विशेष रंगत प्राप्त होणार आहे. या मैफिलीमध्ये सुप्रसिद्ध शास्त्रीय गायक पं. उमेश चौधरी, पं. प्रताप पाटील आणि विदुषी सुरंजना बासू हे प्रमुख गायक म्हणून रसिकांसमोर आपली कला सादर करणार आहेत. तसेच पं. तुषार चॅटर्जी, श्रीमती रंजना चॅटर्जी आणि सौर्यादीप चॅटर्जी यांच्या शास्त्रीय गायनाची मेजवानी रसिकांना मिळणार आहे. कार्यक्रमात मोंद्रिता चॅटर्जी यांच्या कथक नृत्याचे विशेष सादरीकरण होणार असून, त्यांच्या नृत्यातून भारतीय शास्त्रीय नृत्यपरंपरेतील भाव, लय आणि ताल यांचा मनोहारी आविष्कार अनुभवता येणार आहे. गायनाला मंदार दीक्षित संवादिनीची, तर प्रकाश पाटील आणि प्रसाद पाध्ये तबल्याची साथ करणार आहेत. कार्यक्रमाचे निवेदन मोहर भट्टाचार्य करणार आहेत.

संगीत आणि नृत्याच्या माध्यमातून भारतीय संस्कृतीतील प्रेम, अनुराग आणि भावविश्व रसिकांपर्यंत पोहोचविणारी ही मैफल शास्त्रीय संगीतप्रेमींसाठी विशेष पर्वणी ठरणार आहे. नव्या पिढीला भारतीय शास्त्रीय संगीताची ओळख व्हावी आणि रसिकांना दर्जेदार सांगीतिक अनुभव मिळावा, यासाठी ‘संस्कृतीर दिशारी’च्या वतीने हा उपक्रम आयोजित करण्यात आला आहे.या आगळ्यावेगळ्या सांगीतिक सोहळ्याचा मनमुराद आनंद घेण्यासाठी नवी मुंबई, खारघर तसेच परिसरातील संगीतप्रेमी आणि रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

संस्कृतीर दिशारीतर्फे ‘मैफिल-ए-अनुराग’चे आयोजन
सुप्रसिद्ध शास्त्रीय गायक पं. उमेश चौधरी, पं. प्रताप पाटील आणि विदुषी सुरंजना बासू यांच्या गायनाने रंगणार मैफिल

