पनवेल, दि.22 4kNews ः मासिक पाळीचे आरोग्य आणि स्वच्छता याविषयी जागरूकता वाढवण्यासाठी पार्थ पवार फाउंडेशनने झिरो फाउंडेशनच्या सहकार्याने खारघरच्या घोलवाडी गावात 19 डिसेंबर रोजी सॅनिटरी पॅड वितरण अभियान आयोजित केले होते.या कार्यक्रमाला पार्थ पवार फाउंडेशनच्या व्यवस्थापिका सौ. रुची कौर बनुशाली, झिरो फाउंडेशनचे संस्थापक मुस्सदिफ सिराज मोडक, माजी नगरसेविका सौ. मंजुळा कटकराई, समाजसेवक नितेश पाटील यांची उपस्थिती लाभली होती.

अभियानादरम्यान महिलांना आणि किशोरवयीन मुलींना सैनिटरी पॅड वितरित करुन मासिक पाळी स्वच्छतेच्या व्यवस्थापनावर चर्चा करण्यात येऊन मासिक पाळीशी संबंधित सामाजिक अंधश्रद्धा दूर करण्यावर भर देण्यात आला. ग्रामीण भागातील स्वच्छता साधनांची कमतरता दूर करून महिलांचे आरोग्य सुधारण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात आला. झिरो फाउंडेशनचे संस्थापक मुस्सदिफ सिराज मोडक यांनी या कार्यक्रमात बोलताना सांगितले की मासिक पाळी स्वच्छता हा केवळ महिलांचा विषय नाही, तर तो संपूर्ण समाजाचा मुद्दा आहे. या अभियानाद्वारे आम्ही जागरूकता निर्माण करणे आणि प्रत्येक महिलेला मूलभूत स्वच्छता सुविधा उपलब्ध करून देणे हे आमचे ध्येय आहे. पार्थ पवार फाउंडेशनच्या व्यवस्थापिका सौ. रुची कौर बनुशाली म्हणाल्या,

महिलांच्या सशक्तीकरणासाठी हे पाऊल खूप महत्त्वाचे आहे. आरोग्य आणि स्वच्छतेसंदर्भातील गंभीर आव्हानांवर काम करणे अत्यावश्यक आहे. त्यांनी झिरो फाउंडेशन आणि सर्व सहभागींचे यासाठी आभार मानले.

समाजसेवक नितेश पाटील यांनी ग्रामीण भागात मासिक पाळी स्वच्छतेविषयी जागरूकता वाढवण्यासाठी आणि उत्पादने उपलब्ध करून देण्यासाठी सतत प्रयत्न करण्याची गरज अधोरेखित केली. माजी नगरसेविका सौ.मंजुला कटकराई यांनी या उपक्रमाचे कौतुक करताना सांगितले की स्वच्छतेबद्दल जागरूकता वाढवणे आणि सॅनिटरी पॅडसारखी संसाधने उपलब्ध करून देणे हे महिलांच्या सशक्तीकरणासाठी आणि आरोग्यासाठी महत्त्वाचे पाऊल आहे. स्थानिकांनी या उपक्रमाचे जोरदार स्वागत करुन लाभार्थ्यांनी या दतीबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
