पनवेल दि.१७ (संजय कदम) : गेल्या कित्येक वर्षांपासून रेंगाळत असलेले प्रशासकीय भवन आता पूर्णत्वास येत असून आता लवकरच पनवेल शहर पोलीस ठाणे येथे स्थलांतरीत होण्याची चिन्हे आहेत.

पनवेल शहरात नव्याने उभारण्यात आलेल्या नव्या ‘प्रशासकीय भवन’ या इमारतीचे बांधकाम (न्यायालयीन प्रकरण जागा वगळून) पूर्ण झाले आहे. त्यामुळे इमारतीमधील पहिल्या, दुसऱ्या व तिसऱ्या मजल्यावरील कार्यालयीन जागा तहसिल कार्यालय पनवेल यांच्याकडे अगोदरच हस्तांतरित करण्यात आली आहे. या इमारतीमध्ये तळमजल्यावर पनवेल शहर पोलीस ठाणेसाठी जागा आरक्षित करण्यात आली आहे.

त्यानुषंगाने सदर ठिकाणी पोलीस ठाणेअंतर्गत आवश्यक असणारे विविध विभाग उभारण्यात आले आहे. या विभागाची आज परिमंडळ २ चे पोलीस उपायुक्त प्रशांत मोहिते व वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांनी पाहणी केली. यावेळी त्यांना काही त्रुटी आढळून आल्या. याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाचे कनिष्ठ अभियंता निखिल गाडे यांना माहिती दिली व सूचना केल्या.

सदर त्रुटी सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत लवकर पूर्ण झाल्यावर येथे पनवेल शहर पोलीस ठाणे स्थलांतरित करण्यात येईल अशी माहिती पोलीस उपायुक्त प्रशांत मोहिते यांनी यावेळी दिली
