पनवेल, दि.4 (संजय कदम) ः घरफोड्यांसह इतर अनेक गुन्हे ज्यांच्या नावावर असलेल्या एका टोळीतील सराईत गुन्हेगाराला गुन्हे शाखा कक्ष 2 पनवेलच्या पथकाने पाठलाग करून पकडले असले तरी त्याचे इतर साथीदार पसार झाल्याने त्यांना जेरबंद करणे हे पोलिसांसाठी मोठे आवाहन ठरणार आहे.

पनवेल परिसरात घरफोडी व अन्य काही गुन्ह्यातील काही संशयित आरोपी हे दरोडा टाकण्याच्या उद्देशाने वाशीत असल्याची माहिती गुन्हे शाखा परिमंडळ दोनच्या युनिटला मिळाली. या माहितीच्या आधारावर वरिष्ठ पोलीस निरीक्षक उमेश गवळी यांच्या नेतृत्वाखाली सपोनि प्रवीण फडतरे, पोउनि.मानसिंग पाटील, माधव इंगळे,

पो.हवा.रमेश शिंदे, अनिल पाटील, मधुकर गडगे, रणजित पाटील, दिपक डोंगरे, इंद्रजित कानू, रुपेश पाटील, सागर रसाळ, अजित पाटील, पो.शि.विक्रांत माळी आदींचे पथक तात्काळ वाशीतील मिनी सी शोर परिसरात दाखल झाले. संशयित एका गाडीत असल्याचे समजताच या गाडीचा पाठलाग पोलिसांनी सुरू केला.

पोलिसांची चाहूल लागताच या संशयितांनी गाडी सागर विहार कडे वळवली. मात्र रस्ता माहिती नसल्याने सेक्टर आठ येथील नर्सरीकडे वळवली पुढे रस्ता बंद आहे. नेमके त्याच्या गाडीच्या स्टेअरिंग रॉड तुटल्याने गाडी एका ठिकाणी आदळली. त्यांना पोलिसांनी शरण येण्यास सांगितले. परंतु त्यांनी त्यांची तवेरा गाडी पोलीस पथकाच्या अंगावरुन घालून त्यांना जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला.

त्याचप्रमाणे त्या भागातील इतर दोन खाजगी वाहनांना धडक मारुन त्या गाड्यांचे नुकसान केले व त्या संशयितांनी येथील गर्द कांदळवनाचा आधार घेत पळून गेले. मात्र पोलिसांनी थेट जंगलात घुसून शोध मोहीम सुरू केली. यासाठी ड्रोन कॅमेराचे साहाय्य घेण्यात आले. मात्र गर्द झाडी आणि ड्रोन कॅमेराच्या सीमा असल्याने फारसे हाती लागले नाही.

तसेच घटनास्थळी श्वान पथक दाखल झाले होते. व त्यांनी या टोळीतील सराईत गुन्हेगार परमजित पोमण सिंग उर्फ नागेश नागराज (43 रा.पंजाब) याला ताब्यात घेतले असून त्याच्यावर पंजाबसह डायघर पोलीस ठाणे, पार्क साईट पोलीस ठाणे मुंबई सायन पोलीस ठाणे, आर.ए.के.मार्ग पोलीस ठाणे मुंबई, जलालाबाद पोलीस ठाणे आदी ठिकाणी गुन्हे दाखल आहेत.

तसेच त्याचे सहकारी सरदार (पूर्ण नाव माहित नाही), नेपाली थापा (पूर्ण नाव माहिती नाही), हसन (पूर्ण नाव माहित नाही), नेपाली (पूर्ण नाव माहित नाही) व हसन याचा मित्र (पूर्ण नाव माहित नाही) अशा एकूण 5 जणांचा शोध सुरू केला आहे. दरम्यान या गुन्ह्यात वापरणारी लाल रंगाची तवेरा गाडी तसेच गाडीमध्ये स्क्रु ड्रायव्हर, पक्कड, कटावणी, लोखंडी रॉड, हायड्रोलिक कटर, रस्सी बंडल, गोणपाटाच्या गोणी, मोठ्या पिशव्या, हॅण्डग्लोज, कैचीचे पाते, 03 मिरची पुडची पाकीटे असे साहित्य हस्तगत करण्यात आले आहे.
