पनवेल, दि.3 (वार्ताहर) ः पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील वळवली, टेंभोडे गावातील पाणीपुरवठा सुरळीत करण्याबाबत आणि आदई ग्रामपंचायत हद्दीतील नेवाळी गावाला वळवली गावाचे पाणी बंद करुन पाणी दिल्याबद्दल शिवराज प्रकल्पग्रस्त सामाजिक संस्थेने तीव्र संताप व्यक्त करून आज पनवेल महानगरपालिकेचे पाणी पुरवठा विभागाचे उपअभियंता चव्हाण यांची भेट घेवून या संदर्भात त्यांना निवेदन दिले आहे.

यावेळी शिवराज प्रकल्पग्रस्त सामाजिक संस्थेचे अध्यक्ष विश्वास पेटकर, शिवमंदिर कमिटी अध्यक्ष मारुती पाटील, अशोक कान्हा पाटील, मा.सरपंच वळवली दिलीप पाटील, शाखाप्रमुख वळवली प्रवीण पाटील आदींनी या संदर्भात संबंधित अधिकार्यांची भेट घेतली.

संघर्ष करून मिळवलेल्या पाण्यासाठी पुन्हा संघर्ष करण्याची वेळ आलेली आहे. पनवेल महानगर पालीका हद्दीतील वळवली गावात मोठ्या प्रमाणात पाणी टंचाई झाली असून पाच दिवसातुन एकदाच पाणी मिळते, त्यामुळे ग्रामस्थांना नाहक त्रास सहन करावा लागतो. वळवली, टेंभोडेला आलेल्या पाण्याच्या लाईनमधून परस्पर आदई ग्रामपंचायत हद्दीतील नेवाळी गावाला जोडुन महानगरपालिका हद्दीतील वळवली ग्रामस्थांवर अन्यायच केला आहे. पाणीपुरवठा कमी येतो म्हणून टॅकरने पाणी पुरविले जाते.

ते पण अपूर्णच असते. टँकर लांबीने केलेली कृत्रीम पाणीटंचाई आहे असे वाटते. तरी तातडीने याची दखल घेवून वळवली, टेंभोडेचा पाणी पुरवठा सुरळीत करण्यासंदर्भात सूचना कराव्यात व त्याची अंमलबजावणी करण्यास सांगावे अन्यथा आगामी काळात मोर्चा आंदोलन, उपोषण, घेराव यापैकी कोणताही प्रकारचा अवलंब केला जाईल असा इशारा अध्यक्ष विश्वास पेटकर यांनी दिला आहे.
