पनवेल, दि.10 (संजय कदम) ः पिडीत मुलीस फुस लावून कायदेशीर पालकांच्या ताब्यातून घेऊन जाऊन बाहेर राज्यात पसार झालेल्या आरोपीस पनवेल तालुका पोलिसांनी तांत्रिक तपासाच्या आधारे त्याचा पाठलाग करून अखेरीस त्याला पिडीत मुलीसह ताब्यात घेतले आहे.

या संदर्भात सदर मुलीच्या पालकांनी पनवेल तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करताच वपोनि गजानन घाडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनि दीपक शेळके, पो.हवा.महेश धुमाळ, सतीश तांडेल आदींच्या पथकाने तांत्रिक तपासाद्वारे या आरोपीचा शोध सुरू केला असता सदर आरोपी हा वेळोवेळी मोबाईल नंबर बदलत होता, त्याचप्रमाणे राहण्याचे पत्ते सुद्धा बदलत होता. तरी या पथकाने माघार न घेता त्याचा जी यादगीर राज्य कर्नाटक, सिकंदराबाद राज्य तेलंगणा व तिरुपती राज्य आंध्रप्रदेश याठिकाणी पाठलाग करून, तांत्रिक तपास करून

अखेरीस आरोपीस संजय राठोड (22 रा.खैरणेगाव) याला सिकंदराबाद रेल्वे स्टेशन येथे स्थानिक पोलिसांच्या मदतीने त्यास व पीडित मुलीस ताब्यात घेऊन पनवेल तालुका पोलीस ठाणे येथे हजर केले असता, त्याने गुन्ह्याची कबुली दिल्याने व पीडितेने आरोपी विरुद्ध शारीरिक संबंध ठेवल्याने गुन्ह्यात पोक्सो कलम वाढ करून त्यास अटक करून मा न्यायालयासमोर हजर केले असता 5 दिवस पोलीस कोठडी दिली आहे.
