पनवेल, दि.10 (वार्ताहर) ः खारघरमधील स्पॅगेटी, रांजणपाडा ते तळोजाकडे जाणार्या रस्त्यावर खासगी बसेस मुख्य रस्त्याच्या दोन्ही बाजूला पार्क केल्या जातात. त्यामुळे रस्त्यावर वाहतुकीस अडथळा निर्माण होतो. या ठिकाणी पार्क केल्या जाणार्या खासगी बसेसमुळे अपघात होऊ नयेत, तसेच वाहतूक कोंडी टाळण्यासाठी व अत्यावश्यक सेवेतील तसेच इतर वाहनांना सदरचा रस्ता सुकर होण्यासाठी अत्यावश्यक सेवेतील वाहने, शासकीय वाहने वगळून इतर सर्व प्रकारच्या वाहनांसाठी कायमस्वरूपी ’नो-पार्किंग झोन’ संदर्भात अधिसूचना निर्गमित करण्यात आली आहे. याबाबत नवी मुंबई वाहतूक पोलीस उपायुक्त तिरुपती काकडे यांनी आदेश दिले आहेत.

रस्त्याच्या दुतर्फा खासगी बसेस पार्क झाल्याने एक मार्गिका बंद होते. परिणामी इतर वाहने मधल्या वाहिनीवर येतात. त्यामुळे तेथे अपघात होण्याची दाट शक्यता आहे. या ठिकाणी पार्क केलेल्या खासगी बसेस पार्क न करण्याबाबत व पार्क झालेल्या खासगी बसेसवर कारवाई करण्याबाबत खारघर वाहतूक शाखेकडे तसेच वरिष्ठ कार्यालयात तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. या ठिकाणी पार्क केलेल्या खासगी बसेसवर नियमितपणे वाहतूक पोलिसांकडून कारवाई करण्यात येत असते; परंतु तरीदेखील काही खासगी बसेस तेथे पार्क केल्या जात आहेत. या अनुषंगाने ही अधिसूचना जारी करण्यात आली आहे.
