उरण दि 17(विठ्ठल ममताबादे )उरण बोरी येथील रोटरी इंग्लिश मीडियम हायस्कूलमध्ये इयत्ता नववीत शिक्षण घेणाऱ्या अवघ्या १४ वर्षीय प्रियांशी मयूर पाटील हिने विंडसर्फिंग क्रीडा प्रकारात उल्लेखनीय कामगिरी करत उरणसह रायगड आणि महाराष्ट्राच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर सातत्यपूर्ण कामगिरी करत प्रियांशीने सलग दुसऱ्या वर्षी ‘एशियन मेडलिस्ट’चा मान मिळवला आहे.
प्रियांशीने २०२५-२६ या कालावधीत टेक्नो २९३ गट १५ आणि गट १७ गर्ल्स विभागात तब्बल १४ राष्ट्रीय आणि ३ आंतरराष्ट्रीय पदके मिळवत आपल्या क्रीडा कारकिर्दीची दमदार छाप उमटवली आहे. ती याचबरोबर याटिंग असोसिएशन ऑफ महाराष्ट्रच्या माध्यमातून विंडसर्फिंगमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करत आहे.

२०२५ मध्ये सिंगापूर येथे झालेल्या इंटरनॅशनल ओपन विंडसर्फिंग चॅम्पियनशिपमध्ये कांस्यपदक, त्यानंतर नोव्हेंबर २०२५ मध्ये थायलंड येथे झालेल्या एशियन चॅम्पियनशिपमध्ये रौप्यपदक पटकावत प्रियंशीने आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली क्षमता सिद्ध केली.
एवढ्यावरच न थांबता एप्रिल २०२६ मध्ये झालेल्या विंडसर्फिंग वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये टॉप-१० मध्ये स्थान मिळवत तिने पुन्हा एकदा आपल्या आंतरराष्ट्रीय दर्जाची प्रचिती दिली. त्यानंतर जुलै २०२६ मध्ये पोलंड येथे झालेल्या युरोपियन चॅम्पियनशिपमध्येही सहभाग नोंदवला.

दरम्यान, ४ ते ८ ऑगस्ट २०२६ दरम्यान मलेशिया येथे झालेल्या एशियन चॅम्पियनशिपमध्ये प्रियांशीने चुरशीच्या शर्यतीत दमदार कामगिरी करत कांस्यपदक पटकावले. या कामगिरीमुळे २०२५ आणि २०२६ अशी सलग दोन वर्षे आशियाई स्तरावर पदक मिळवणाऱ्या महाराष्ट्रातील कमी वयाच्या खेळाडूंमध्ये तिच्या नावाची विशेष नोंद झाली आहे.

अत्यंत कमी वयात राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर सातत्यपूर्ण कामगिरी करणाऱ्या प्रियांशीच्या यशाचे उरण परिसरासह महाराष्ट्रातून कौतुक होत आहे. तिच्या या उल्लेखनीय कामगिरीमुळे कुटुंबीय, शाळा, क्रीडा क्षेत्र आणि संपूर्ण परिसराचा गौरव वाढला असून भारताचे नाव आंतरराष्ट्रीय पातळीवर उंचावले आहे.विशेष म्हणजे कोणतेही प्रशिक्षक नसताना केवळ आई वडिलांच्या मार्गदर्शनाखाली तिने हे यश मिळविले आहे.प्रियंशीच्या पुढील आंतरराष्ट्रीय वाटचालीसाठी क्रीडाप्रेमी, शिक्षक, पालक आणि नागरिकांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. भविष्यात प्रियांशीने भारतासाठी आणखी मोठी पदके जिंकावीत आणि देशाचा तिरंगा आंतरराष्ट्रीय क्रीडा मंचावर अभिमानाने फडकवावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

