4kNews कामोठे
मुंबई, दि. १ (प्रतिनिधी) : संत तुकाराम महाराजांच्या साधना व आध्यात्मिक परंपरेशी निगडित पुणे जिल्ह्यातील देहूजवळच्या भामचंद्र-भंडारा डोंगर परिसरातील कथित अवैध उत्खनन, अतिक्रमण व अनधिकृत बांधकामे तातडीने थांबवावीत, अशी मागणी संतभूमी संरक्षक संघर्ष समितीचे संस्थापक अध्यक्ष ह.भ.प. तुकयाभक्त मधुसूदन पाटील महाराज यांनी केली.

मुंबई मराठी पत्रकार संघात झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी ही मागणी केली. भामचंद्र-भंडारा परिसराला राज्य संरक्षित स्मारकाचा दर्जा मिळालेला असतानाही उत्खनन व बांधकामे सुरू असल्यास संबंधित यंत्रणांनी तातडीने कारवाई करावी, असे त्यांनी सांगितले.
या परिसरात जेसीबीच्या माध्यमातून खोदकाम तसेच क्रशर, पेट्रोल पंप, गोदामे व अन्य बांधकामांमुळे ऐतिहासिक व धार्मिक वारशाला धोका निर्माण होत असल्याचा आरोप त्यांनी केला. राज्य संरक्षित स्मारकाच्या अधिसूचनेची प्रभावी अंमलबजावणी करून ऐतिहासिक गुहा, पुरातत्त्वीय अवशेष व धार्मिक स्थळांचे शास्त्रोक्त सर्वेक्षण करावे, अशी मागणीही करण्यात आली.

या प्रश्नावर शासनाकडे सातत्याने पत्रव्यवहार व निवेदने देण्यात आली असून, लवकरच बैठक होण्याची शक्यता असल्याचे पाटील महाराज यांनी सांगितले. दरम्यान, तातडीने कारवाई न झाल्यास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला.

