4kNews कामोठे
पनवेल, दि.31(वार्ताहर) : पनवेल शहरातील मोहल्ला परिसरात बेशिस्त पार्किंगमुळे निर्माण होणाऱ्या वाहतूक कोंडीची दखल घेत पनवेल शहर वाहतूक शाखेने कारवाई सुरू केली आहे. दुचाकी, चारचाकी आणि रिक्षा रस्त्यावर अस्ताव्यस्त उभ्या केल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत होता. याबाबतच्या तक्रारींची दखल घेत वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुभाष पुजारी यांनी स्वतः लक्ष घालून संबंधित वाहनचालकांना समज देत कारवाई केली.

वाहने निर्धारित पार्किंगच्या जागेतच उभी करावीत, रिक्षाचालकांनी अधिकृत थांब्यांचाच वापर करावा तसेच रस्त्यावर हातगाड्या उभ्या करून वाहतुकीला अडथळा निर्माण करू नये, अशा सूचना देण्यात आल्या. परिसरात दीर्घकाळापासून उभी असलेली जुनी व बेवारस वाहने हटविण्यासाठी पनवेल महापालिकेच्या संबंधित विभागाशी संपर्क साधून कार्यवाही केली जाणार असल्याचे पुजारी यांनी सांगितले.

यावेळी स्थानिक नगरसेवक लतीफ शेख, माजी नगरसेवक मुकीत काझी आणि युवा नेतृत्व जवाद काझी यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक पुजारी यांची भेट घेऊन वाहतूक कोंडी व नागरिकांच्या समस्यांबाबत चर्चा केली. परिसरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी अशा प्रकारची नियमित कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

