पनवेल, दि.10 (वार्ताहर) ः पनवेल तालुक्यातील काळुंद्रे गाव आणि तक्का गाव यांच्या मधून वाहणार्या गाढी नदीच्या पात्राजवळच व्यावसायिकांकडून प्रचंड प्रमाणात भराव करण्यात आला आहे. या भरावाच्या कामा दरम्यान नदीच्या पात्रातही भर टाकण्यात आली आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात परिसरातील गावामध्ये पाणी शिरण्याची दाट शक्यता आहे तरी अशा प्रकारे बेकायदा भराव करणार्या व्यावसायिकांवर कारवाई करण्याची मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाकडून महानगरपालिका आयुक्त मंंगेश चितळे यांच्याकडे करण्यात आली आहे.

आज शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उप शहर संघटक नंदू घरत यांच्यासह शहरप्रमुख प्रवीण जाधव व युवासेना जिल्हाधिकारी पराग मोहिते यांनी महानगर पालिका आयुक्त मंगेश चितळे यांची भेट घेतली. पावसाळ्यात नेहमीच गाढी नदीचे पात्र ओसंडून वाहत असते ज्यामुळे काळुंद्रे गावात पाणी भरते. आता या भरावामुळे हे पाणी गावाच्या हद्दीत मोठ्या प्रमाणात भरून गावातील रहिवासी परिसरात मोठे नुकसान होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

तरी संबंधित व्यावसायिकांवर कारवाई करण्यात यावी यासाठी नंदू घरत यांनी महापालिका आयुक्तांना निवेदन देऊन तात्काळ दखल घ्यायची विनंती केली आहे. या मागणीची महापालिका आयुक्तांनी तात्काळ संबंधित विभागाला पाहणी करून कारवाई करण्याचे आदेश या भेटी दरम्यान दिले आहेत. त्याचप्रमाणे तहसीलदार विजय पाटील यांनीही पाटबंधारे खात्याला याची तपासणी करण्याच्या सूचना करण्यास सांगितले आहे.
