महिला सुरक्षा ही आमची प्राथमिकता ः आयुक्त मंगेश चितळे
पनवेल, दि.10 (वार्ताहर) ः जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून रायगड प्रेस क्लब संलग्न पनवेल तालुका प्रेस क्लब तर्फे विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान महिलांचा सन्मान वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात करण्यात आला. यावेळी पनवेलचे महानगरपालिकेचे आयुक्त मंगेश चितळे, तहसीलदार विजय पाटील, अतिरिक्त आयुक्त कैलास गावडे, पिल्लई कॉलेजच्या निवेदिता श्रेयन्स आणि पनवेल प्रेस क्लबचे अध्यक्ष प्रशांत शेडगे यावेळी उपस्थित होते. यावेळी बोलताना आयुक्त मंगेश चितळे यांनी सांगितले की, देशाचे पंतप्रधान यांनी सांगितले की, महिला सुरक्षा ही प्राथमिकता असून पनवेल महानगरपालिका देखील त्या अनुषंगाने महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने महानगरपालिकेमार्फत बनविण्यात येणार्या अॅपमध्ये महिलांसाठी निर्भया हेल्पलाईनचा समावेश करण्यात आला असल्याची माहिती दिली.

यावेळी विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान महिलांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. यामध्ये निवेदिता श्रेयन्स (पिल्लई कॉलेज), गीतांजली पाटील (अग्नीशमन दल, पनवेल), स्मिता जोशी (उद्योजिका, वीणा वर्ल्ड), स्वप्नाली चौधरी (पनवेल महानगरपालिका), आरती रेवसकर (मंडळ अधिकारी, कळंबोली), अॅड.सुचिता पाटील (वकील, पनवेल), वर्षा कुलकर्णी (जनसंपर्क अधिकारी, पनवेल महानगरपालिका), साधना पवार (पनवेल शहर पोलीस स्टेशन), शिला सांगळे (सायबर पोलीस स्टेशन, नवी मुंबई), तृप्ती पालकर (पत्रकार), रोहिणी कुरंदेकर (उद्योजिका, रोहिणी कॅटरर्स), चित्रलेखा जाधव (शिक्षिका, उसर्ली, पनवेल), रुपाली हिर्लेकर (निवेदिका), श्वेता कुमार (मिडीया सेल) यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी पनवेल तालुका प्रेस क्लबचे सचिव दत्तात्रय कुलकर्णी, उपाध्यक्षा तृप्ती पालकर, खजिनदार राकेश पितळे, सहसचिव स्वप्नील दुधारे, सल्लागार सुमंत नलावडे, अनिल भोळे, रायगड प्रेस क्लब जिल्हा सल्लागार, संजय कदम, सदस्य गणेश कोळी, सचिन भोळे, सन्नी पांडे, प्रतिक वेदपाठक आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन रंगभूमीकार आणि ज्येष्ठ पत्रकार विजय पवार यांनी केले तर आभार प्रदर्शन अध्यक्ष प्रशांत शेडगे यांनी मानले.
