लंडनमध्ये झालेल्या ऐतिहासिक वस्तूंच्या लिलावात महाराष्ट्राने एक महत्त्वाचा वारसा जिंकला आहे. नागपूरकर भोसले घराण्याचे संस्थापक आणि छत्रपती शाहू महाराज यांच्या काळातील मराठा सैन्यातील प्रभावशाली सरदार रघुजी भोसले यांची तलवार महाराष्ट्र शासनाने अधिकृतपणे ताब्यात घेतली आहे.

ही तलवार लिलावासाठी उपलब्ध होताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांस्कृतिक कार्य मंत्री अशिष शेलार यांना तातडीने शासनातर्फे या लिलावात सहभागी होण्याचे निर्देश दिले. त्यांच्या पुढाकारामुळे महाराष्ट्र शासनाने हा लिलाव जिंकून तलवार ताब्यात घेतली. सोमवारी (११ ऑगस्ट) लंडन येथे मंत्री शेलार यांनी ही तलवार स्विकारली.

सांस्कृतिक आणि ऐतिहासिक महत्त्व असलेल्या या तलवारीसह संबंधित काही दस्तऐवज देखील प्राप्त झाले आहेत. मराठा साम्राज्याच्या गौरवशाली इतिहासाशी निगडित हा वारसा येत्या सोमवार, १८ ऑगस्ट रोजी मुंबईत दाखल होणार आहे.

तलवार मुंबईत आल्यानंतर तिचे जतन आणि प्रदर्शना संबंधी पुढील योजना शासन करणार असून, ही वस्तू भविष्यातील पिढ्यांसाठी प्रेरणादायी ठरेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.
