4k समाचार
पनवेल दि.०5(वार्ताहर): पनवेल शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी सुमारे १५ कोटी रुपये खर्चून बांधलेल्या ‘प्रशासकीय भवना’ची सध्या अत्यंत दयनीय अवस्था झाली असून, येथे येणाऱ्या सामान्य नागरिकांना कोणत्याही मूलभूत सुविधा उपलब्ध नाहीत. या दुरवस्थेबद्दल शिवसेना पनवेल महानगर-जिल्हा शाखेचे स्थानिक व अनुभवी नेते चंद्रशेखर सोमण यांनी उपविभागीय (प्रांत) अधिकारी,पनवेल पवन चांडक यांच्याकडे लेखी निवेदन देऊन जाहीर निषेध नोंदवला आहे.

या प्रशासकीय इमारतीचा मूळ उद्देश शासनाची तालुका स्तरावरील महत्त्वाची कार्यालये एकाच छताखाली आणून नागरिकांना सर्व नागरी सुविधा एकाच ठिकाणी देणे हा आहे. परंतु, १४ ऑक्टोबर २०२४ रोजी महसूल खात्याकडे हस्तांतरित झालेल्या या इमारतीत अवघ्या काही दिवसांतच अस्वच्छतेचा कळस गाठला आहे.अस्वच्छ प्रसाधन गृहे, बंद असलेली लिफ्ट,पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई, प्रचंड प्रमाणात असलेली अस्वच्छता, वारंवार खंडित होणारा वीजपुरवठा, अपुरी सुरक्षा व्यवस्था आणि सी.सी. टीव्ही कॅमेऱ्यांची अनुपलब्धता अशा अनेक समस्या भेडसावत आहेत. एका बाजूला पनवेल परिसरात आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन होणार आहे, तर दुसऱ्या बाजूला प्रशासकीय भवनाची ही दुरवस्था विकसनशील व प्रगतशील तालुक्यासाठी भूषणावह नाही,

असे शिवसेने स्पष्ट केले आहे. शिवसेनेने या इमारतीच्या स्वच्छतेची आणि इतर सुविधांची जबाबदारी नेमकी कोणाची, याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाकडे पत्राद्वारे विचारणा केली होती. आता श्री. सोमण यांनी उपविभागीय अधिकाऱ्यांकडे याप्रकरणी तात्काळ लक्ष घालून कार्यवाही करण्याची मागणी केली आहे. तसेच, सदर ठिकाणी प्रस्तावित असलेली इतर शासकीय कार्यालये कधी स्थलांतरित होणार, याची स्पष्टता मिळावी, अशी विनंती केली आहे. जर ‘तात्काळ कार्यवाही न झाल्यास’, शिवसेनेच्या पद्धतीने निषेध म्हणून सदर इमारतीजवळ कुठलीही पूर्वसूचना न देता आंदोलन करण्यात येईल, असा सज्जड इशाराही निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. याप्रसंगी शिवसेनेचे चंद्रशेखर सोमण यांच्यासोबत महानगरप्रमुख प्रथमेश सोमण, महानगर संघटक मंगेश रानावडे, उपमहानगर प्रमुख महेश सावंत, शहर प्रमुख प्रसाद सोनावणे, संघटक अभिजीत साखरे, उपशहर संघटक खंडेश धनावडे, सिद्धेश पवार, विजय जाधव, गणेश वाघिलकर, महेश गाडगीळ आदी उपस्थित होते. या संदर्भातील सर्व मागणीचे निवेदने संबंधित शासकीय खात्यांना श्री सोमण यांनी पाठवली आहेत.
