4k समाचार
पनवेल दि.16 (संजय कदम): शिवाजी महाराजांच्या स्वराज्यात किल्ल्यांचे महत्त्व खूप जास्त होते.ते फक्त संरक्षणासाठी नव्हते तर स्वराज्याच्या राजनैतिक, लष्करी आणि आर्थिक धोरणांचा आधार होते. किल्ले ही स्वराज्याची प्रबळ सुरक्षा व्यवस्था होती, ज्यातून शत्रूंपासून स्वराज्याचे संरक्षण करणे, लष्करी कारवाया करणे आणि सैन्यासाठी आश्रयस्थान मिळवणे शक्य झाले. राजगड, रायगड यांसारख्या किल्ले राजधानी आणि प्रशासनाचे केंद्र बनले, तर सिंधुदुर्गसारखे जलदुर्ग समुद्रावरून होणाऱ्या आक्रमणांपासून स्वराज्याचे रक्षण करण्यासाठी महत्त्वाचे होते.याच सिंधूदुर्ग किल्ल्याची भव्य प्रतिकृती ओरायन मॉल मध्ये उभारण्यात आली आहे.
दिवाळीत किल्ले बनविण्याची परंपरा आजही बच्चे कंपनी जोपासत आहे.शहरी भागात हि परंपरा काही प्रमाणात लुप्त होत चालली असताना ओरायन मॉल ने हि संस्कृती जपत भव्य सिंधुदुर्ग किल्ला मॉल मध्ये उभारला आहे.दिवाळी निमित्त मॉल मध्ये येणाऱ्या नागरिकांमध्ये आपल्या संस्कृतीचा जागर व्हावा यादृष्टीने हा उपक्रम राबविण्यात आल्याची माहिती ओरायन मॉलचे मालक मंगेश परुळेकर यांनी दिली. दरवर्षी दिवाळी आणि विविध सणांना आकर्षक संदेशात्मक देखावे उभारण्याचे काम ओरायन मॉल करते.मॉल संस्कृती जरी पाश्चिमात्य संस्कृतीचा भाग असला तरी आमच्या मार्फत सांस्कृतिक कार्यक्रम आम्ही याठिकाणी राबवून संस्कृतीचे जतन करण्याचे आम्ही प्रयत्न करतो असे मनन परुळेकर यांनी सांगितले.
