नवीन बातम्या
GJS 2026 दिवाळी आवृत्तीचे उदय सामंत यांच्या हस्ते उद्घाटन
SCI भारताच्या सागरी महत्त्वाकांक्षेचा आधारस्तंभ : सोनोवाल
*बनावट नंबर प्लेट चा वापर करून विनयभंग व अपघात करणारा थार चालक यास अवघ्या 10 तासात ताब्यात घेतलेबाबत*
पनवेलच्या सांगुर्ली जिल्हा परिषद शाळेची यशोगाथा राष्ट्रीय पोर्टलवर‌.मुख्याध्यापिका मानसी भोसले यांच्या लेखणीतून उलगडला शैक्षणिक परिवर्तनाचा प्रेरणादायी प्रवास
पनवेलमध्ये त्वचा, केस, लेझर व एस्थेटिक केअरसाठी अत्याधुनिक ‘Skinourish’चे उद्घाटन
पनवेलच्या गुलाब बागवानची दिल्लीपर्यंत भरारी
नित्याज जेम्स अँड ज्वेलरीचा आयपीओ ३० सप्टेंबरला खुला
सज्ज आहेत माझे हात : अपोलो हॉस्पिटल्सच्या सीपीआर मोहिमेची विश्वविक्रम नोंद 30 दिवसांत 61,221 नागरिकांनी घेतली सीपीआर शिकण्याची शपथ
CREDAI MCHI YOUTH NMR कडून नवी मुंबई व रायगडमध्ये ‘Ease of Doing Redevelopment (EODR) 2.0’ची घोषणा

सिडको-पनवेलच्या पाणीपुरवठ्याची श्वेतपत्रिका सादर करा शिवसेना उपजिल्हाप्रमुख भरत पाटील यांची आदित्य ठाकरे यांच्याकडे मागणी; विधानसभेत प्रश्न उपस्थित करण्याचे आवाहन

4kNews कामोठे
पनवेल, दि. १९ (वार्ताहर) : सिडको आणि पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांना भेडसावत असलेल्या पाणीपुरवठ्याच्या गंभीर समस्येवर शासनाने तातडीने लक्ष घालावे. या समस्येचे मूळ, उपलब्ध जलस्रोत, पाणी वितरण व्यवस्था तसेच वाढत्या लोकसंख्येच्या तुलनेत भविष्यातील पाणीपुरवठ्याचे नियोजन याबाबत सिडको आणि पनवेल महानगरपालिकेने सविस्तर श्वेतपत्रिका सादर करावी, अशी मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे रायगड-पनवेल उपजिल्हाप्रमुख भरत बुधाजी पाटील यांनी केली आहे. 


याबाबत पाटील यांनी महाराष्ट्र विधिमंडळ पक्षाचे नेते तथा शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांना निवेदन देऊन हा विषय विधानसभेत उपस्थित करून शासनाचे लक्ष वेधण्याची विनंती केली आहे.
सिडकोच्या माध्यमातून विकसित झालेल्या तसेच पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील झपाट्याने वाढणाऱ्या नागरी वसाहतींच्या तुलनेत पाणीपुरवठ्याची उपलब्धता आणि वितरण व्यवस्था सक्षम करणे आवश्यक आहे. मात्र, उपलब्ध पाणी आणि नागरिकांची वाढती गरज यामध्ये तफावत असल्याने पाणीपुरवठ्याचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत असल्याचे पाटील यांनी म्हटले आहे.


प्रस्तावित श्वेतपत्रिकेत उपलब्ध जलस्रोत आणि त्यांची क्षमता, सिडको व पनवेल महानगरपालिका क्षेत्राला प्रत्यक्ष उपलब्ध होणारे पाणी, नागरिकांना प्रत्यक्ष वितरित होणारे पाणी, पाणीपुरवठ्यातील तफावत, वितरण व्यवस्थेची स्थिती, पाणीगळती, जलवाहिन्या व पंपिंग यंत्रणेची सद्यस्थिती, सुरू असलेली कामे आणि त्यावरील खर्च यांचा सविस्तर आढावा असावा, अशी मागणी पाटील यांनी केली आहे.
तसेच आगामी काळात वाढणारी लोकसंख्या, नव्या नागरी वसाहती आणि त्यानुसार निर्माण होणारी पाण्याची गरज लक्षात घेऊन भविष्यातील पाणीपुरवठ्याचे नियोजन काय आहे, याची स्पष्ट माहितीही जनतेसमोर येणे आवश्यक असल्याचे त्यांनी निवेदनात नमूद केले आहे.


पाणी हा नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी निगडित मूलभूत प्रश्न असल्याने शासनाने या समस्येकडे गांभीर्याने पाहणे गरजेचे आहे. त्यामुळे आदित्य ठाकरे यांनी हा विषय महाराष्ट्र विधानसभेत प्रश्न, लक्षवेधी सूचना किंवा योग्य त्या संसदीय आयुधाद्वारे उपस्थित करून शासनाचे लक्ष वेधावे. तसेच सिडको आणि पनवेल महानगरपालिकेकडून पाणीपुरवठ्याबाबत अधिकृत श्वेतपत्रिका सादर करण्याचे निर्देश संबंधित विभागांना देण्यासाठी पाठपुरावा करावा, अशी मागणी भरत पाटील यांनी केली आहे.
पनवेल शहर आणि परिसरातील नागरिकांना नियमित, पुरेसा व नियोजित पाणीपुरवठा मिळावा यासाठी शासनाने या प्रश्नाची गांभीर्याने दखल घेऊन तातडीने कार्यवाही करावी आणि नागरिकांना न्याय मिळवून द्यावा, अशी अपेक्षा पाटील यांनी व्यक्त केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top