पनवेल, दि.17 (वार्ताहर) ः रूमचा ताबा न देता दिलेले साडेबारा लाख रुपये परत न केल्याप्रकरणी शंकर गडाला (रा. सेक्टर 6, खारघर), आदी बालामुर्गन (तळोजा फेज टू) यांच्या विरोधात खारघर पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला.

दीपशिखा प्रवीण जोशी या खारघर, सेक्टर 19 येथे राहत असून, त्या रूम शोधत होत्या. या वेळी शंकर गडाला या एजंटसोबत त्यांची ओळख झाली. त्याने आदी बालामुर्गन यांच्याशी ओळख करून दिली. त्यांनी सेक्टर 6 येथील रूम 33 महिन्यांसाठी घ्यावे लागेल, असे सांगितले.

त्यानुसार त्यांनी 11 लाख रूमचे मालक आदी यांच्या अकाउंटवर ट्रान्सफर केले. त्यानंतर एक लाख 90 हजार यूपीआयने घेतले. त्यातील 40 हजार रुपये परत करण्यात आले. रूमचा ताबा मागितला असता महिन्याला 20 हजार रुपये भाडे देण्याचे मान्य करून आदी यांनी रूमचा ताबा स्वतःकडेच ठेवला. रूमचा ताबा दिला नाहीच शिवाय दिलेले पैसेही त्यांनी परत केले नाहीत.
