पनवेल, दि.27 (वार्ताहर) ः कळंबोली मध्ये सुरू असलेली विकास कामे सध्या पावसामुळे नागरिकांना अडचणींचा ठरत आहे. येथील संथ गतीने होणार्या कामांना लवकर प्रगती पथावर आणावे, अशी मागणी शिवसेना जिल्हाप्रमुख रामदास शेवाळे यांनी पनवेल पालिकेकडे केली आहे.

कळंबोली वसाहतीमध्ये सध्या मोठ्या प्रमाणावर ती रस्त्याचे काँक्रिटीकरण व गटाराची कामे सुरू आहेत परंतु पंधरा दिवस आधी मान्सून सुरू झाल्याने कळंबोली वसाहत जलमय झाले आहे त्यामुळे अपूर्ण झालेली उन्हाळी कामे आता नागरिकांची चिंता वाढवत आहेत. मुली वसाहती मधील टप्प्याटप्प्याने होत असलेले रस्त्याची कामे पावसाळ्यापूर्वी होणे अपेक्षित होते. वाहतुकीसाठी एकाच बाजूचा रस्ता उपलब्ध होत असल्याने हा रास्ता अपुरा पडत आहे.

तसेच विद्युत वाहिन्यांवर झाडे पडल्याने वीजपुरवठा वारंवार खंडित होत आहे. कळंबोली वसाहतीमध्ये रस्ता, वीज पायाभूत गरजांवरच गदा आल्याचे चित्र आहे. सोमवारी पडलेल्या मुसळधार पावसामध्ये वसाहती मधील अनेक घरांमध्ये पाणी शिरले होते यावेळी पनवेल पालिकेचे अधिकारी व जिल्हाप्रमुख रामदास शेवाळे यांनी कळंबोली वसाहतीचे संयुक्त पाहणी केली त्यावेळी रामदास शेवाळे यांनी वसाहती मधील नागरिकांना दिलासा मिळेल अशा प्रकारचे नियोजन करण्याच्या सूचना पालिका अधिकार्यांना दिल्या.
