4k समाचार
उरण दि १३(विठ्ठल ममताबादे )
उरण तालुक्यातील उरण पनवेल मुख्य रस्त्यावर दास्तान फाटा येथे अपघाताचे तसेच वाहतूक कोंडीचे वाढते प्रमाण व भविष्यातील होणारे अपघात टाळण्यासाठी सिग्नल असणे अत्यावश्यक झाले आहे.आतापर्यंत त्या ठिकाणी आणि जासई ब्रिजजवळ आणि आसपास १७ अपघात झाले आहेत, त्यापैकी काही किरकोळ तर काही गंभीर स्वरूपाचे अपघात झाले आहेत, काही जणांना मृत्यूला देखील समोर जावे लागले आहे.म्हणून तेथे सिग्नल असणे अत्यावश्यक झाले आहे.भविष्यात त्याठिकाणी जे.एन.पी.टी नोड देखील नव्याने होणार आहे.

अशावेळी रहदारी देखील वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही म्हणून कोणत्याही निष्पाप लोकांचे जीव धोक्यात जावू नये, कोणाचेही अपघात होऊ नये म्हणून दास्तान फाटा येथे सिग्नल बसविण्यात यावे अशी मागणी शेतकरी कामगार पक्षाचे उरण विधानसभा अध्यक्ष मयूर सुतार यांनी वाहतूक प्रशासनाचे वरिष्ठ अधिकारी तिरुपती काकडे (डी. सी.पी वाहतूक विभाग नवी मुंबई )यांच्याकडे पत्रव्यवहार करून केले आहे.

यावर लवकरच याबाबत निर्णय घेऊ असे आश्वासन डीसीपी तिरुपती काकडे यांनी मयूर सुतार यांना दिले आहेत. याबाबतीत मयूर सुतार यांनी जेएनपीटी(जेएनपीए )व्यवस्थापक मनीषा जाधव यांच्याशी पत्रव्यवहार केला असता त्यांनीही या मागणीस सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.मयूर सुतार यांनी सदर बाब जेएनपीटीचे मुख्य महा प्रबंधक डॉ. जी वैद्यनाथन यांच्याही निदर्शनास आणून दिली त्यांनीही सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.जर दास्तान फाटा येथे सिग्नल झाल्यास अनेकांचे होणारे अपघात टळणार आहेत. त्यामुळे लवकरात लवकर येथे सिग्नल असावे अशीही मागणी आता जनतेतून होऊ लागली आहे.
